मनोरीला लागलेल्या आगीत मच्छिमारांच्या जाळ्या भस्मसात, आमदार सुनील राणे यांनी केली आर्थिक मदत
By मनोहर कुंभेजकर | Published: February 21, 2023 05:18 PM2023-02-21T17:18:59+5:302023-02-21T17:20:46+5:30
यामुळे येथील मच्छिमारांवर उपासमारीची पाळी आली होती आणि मनोरीकरांच्या बोटी या सुमुद्रात जाऊ शकल्या नव्हत्या.
मुंबई-बोरिवली विधानसभा क्षेत्रातील मालाड पश्चिम मनोरी येथे दि,१९ फेब्रुवारी रोजी लागलेल्या भीषण आगीत येथील सुमारे ९७ मच्छिमारांच्या 'डोल आणि भोक्सी या प्रकारच्या जाळ्या आणि त्यांच्या सहा शेड्स भस्मसात झाल्या. यामुळे येथील मच्छिमारांवर उपासमारीची पाळी आली होती आणि मनोरीकरांच्या बोटी या सुमुद्रात जाऊ शकल्या नव्हत्या.
सदर बाब बोरीवली क्षेत्राचे आमदार सुनील राणे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. आणि विशेष म्हणजे आम्हाला तातडीची पाच लाखांची मदत त्यांनी आमच्या येथील मच्छिमार संघटनेकडे सुपूर्द केली. यामुळे आज आमची रोजी रोटी पुन्हा सुरू झाली आणि आमच्या बोटी समुद्रात गेल्या. विशेष म्हणजे तहसीलदारांनी त्वरित पंचनामा करणे, मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधणे या गोष्टी लवकर पार पाडण्यात आणि सुसूत्रता आणण्यात आमदार सुनील राणे यांनी महत्वाची भूमिका बजावली अशी माहिती येथील मच्छिमारांनी दिली.
याप्रकरणी आमदार सुनील राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, येथील मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून आपण स्वतः त्यांना तातडीने मदत केली. तर कालच उपनगर जिल्हाधिकारी यांच्याकडे मदतीसाठी पत्रव्यवहार करून लवकरच आपल्या आमदार निधीतून दहा लाखांची मदत येथील आपदग्रस्त मच्छिमारांना मिळणार आहे.तर केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या कडे सुद्धा मदतीसाठी पत्रव्यवहार केला आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मुख्यमंत्री निधीतून येथील अपाद्ग्रस्त मच्छिमारांना विशेष आर्थिक मदत करावी अशी मागणी आपण पत्राद्वारे त्यांना केली आहे आणि मुख्यमंत्री लवकरच आर्थिक मदत जाहिर करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.