मेट्रोच्या कामात हलगर्जीपणा?
By admin | Published: August 12, 2016 02:33 AM2016-08-12T02:33:10+5:302016-08-12T02:33:10+5:30
बेलापूर ते पेंधर दरम्यान उभारल्या जाणाऱ्या सुमारे ११.१० किमीच्या मेट्रो प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरूआहे. २०११ मध्ये प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झाली.
वैभव गायकर, पनवेल
बेलापूर ते पेंधर दरम्यान उभारल्या जाणाऱ्या सुमारे ११.१० किमीच्या मेट्रो प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरूआहे. २०११ मध्ये प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झाली. २०१५ मध्ये हे काम पूर्ण होणार असल्याचे सिडकोने सांगितले होते. मात्र २०१७ मध्येही हे काम पूर्णत्वाला येईल का याबाबत साशंकता आहे. कासव गतीने सुरू असलेल्या या कामामुळे शहरवासीयांना मोठा अडथळा निर्माण झाला असून मेट्रोच्या मार्गावर पापडीचा पाडा गावाजवळ उभ्या असलेल्या क्रेनला धडकून एक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना दि. ११ रोजी पहाटे घडली. त्यामुळे मेट्रोच्या कामात हलगर्जीपणा होत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे .
मयत दुचाकीस्वाराची ओळख पटलेली नसून तो एमएच ०६ , आयएस २७५७ या दुचाकीने खारघरमधून मुंब्य्राच्या दिशेने चालला होता. यावेळी मेट्रोच्या मार्गावर अंधार असल्याने रस्त्याच्या मधोमध उभी असलेली क्रेन त्या दुचाकीस्वाराला दिसली नसल्याने त्याची जोराने धडक या क्रेनला बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. येथील रहिवाशांनी खारघर पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पाहणी करुन मयत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
संबंधित घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. खारघरमध्ये अनेक ठिकाणी अशाप्रकारची हलगर्जी मेट्रोच्या कामात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काम चालू असलेल्या अनेक ठिकाणी सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत.
बेलापूर- खारघर- तळोजा-पेंधर या ११ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्पाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. या मार्गावर एकूण ११ स्थानके आहेत. या प्रकल्पाला सुरुवातीला सुमारे दोन हजार कोटी खर्च निर्धारित करण्यात आला होता. परंतु मेट्रोचे काम रखडल्यामुळे हा खर्च वाढला. २०१५मध्ये हे काम पूर्ण होणार होते. मात्र २०१७ पर्यंत तरी हे काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर आहे. सध्या ८० टक्के काम या मार्गाचे पूर्ण झाले आहे. स्थानक उभारणीची कामे सध्या सुरू आहेत.
महत्त्वाचे म्हणजे मेट्रो मार्गावरील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम देखील सध्या सुरु आहे. या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. मात्र कोणत्या दिवशी कोणता रस्ता बंद होईल हे सांगता येत नाही. यामुळे देखील खारघरवासी संभ्रमतेमध्ये आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी सिडकोमध्ये
रुजू होताच सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पाहणी केली होती. त्यामध्ये मेट्रोच्या कामाचा देखील समावेश होता. मेट्रोच्या कामाला गती येण्यासाठी त्यांनी आवश्यक त्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या.