Join us

कार्यकर्त्यांनो, कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका; राज ठाकरेंनी केली कळकळीची विनंती 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 7:07 PM

पक्षावर प्रेम होतं तसंच तुम्हा सगळ्यांचं माझ्यावर, आपल्या पक्षावर मनापासून प्रेम आहे ह्याची मला जाणीव आहे.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठविलेल्या ईडीच्या नोटिशीनंतर ठाण्यातील मनसे कार्यकर्त्याने स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना घडली आहे. ८५ टक्के भाजल्याने या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती केली आहे. 

राज ठाकरेंनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की, आपला सहकारी प्रवीण चौगुले ह्याच्या निधनाच्या बातमीने माझं मन व्यथित झालं आहे. मला ईडीची नोटीस आली, ह्या बातमीने अस्वस्थ होऊन प्रवीणने आत्मदहनासारखा टोकाचा मार्ग निवडला. हे व्हायला नको होतं. प्रवीणचं जसं माझ्यावर, पक्षावर प्रेम होतं तसंच तुम्हा सगळ्यांचं माझ्यावर, आपल्या पक्षावर मनापासून प्रेम आहे ह्याची मला जाणीव आहे.  

मात्र कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका. ह्या आधी देखील अनेक कठीण प्रसंगांमधून आपण बाहेर पडलो आहोत त्यामुळे तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर आपण ह्या प्रसंगावर देखील मात करू हे नक्की असा विश्वास राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे.   तसेच ईडी सारख्या संस्थांना काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यांना मी योग्य ती उत्तरं देईन. तुम्ही सर्वानी शांतता राखा आणि कोणीही उद्या ईडीच्या कार्यालयाच्या जवळ कोणीही येऊ नका. कालच्या माझ्या सूचनेनंतर देखील अनेक जण ईडीच्या कार्यालयाजवळ येण्याचा विचार करत आहेत असं मला कळलं, तुमचं खरंच माझ्यावर प्रेम असेल तर तुम्ही तिथे येणार नाही असं आवाहन राज यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. 

तुमच्या कुठल्याही कृतीने सर्वसामान्य माणसांना कोणताही त्रास होणार नाही अथवा सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्तेचं नुकसान होणार नाही ह्याची काळजी घ्या. बाकी ह्या विषयावर जे बोलायचं आहे ते मी योग्य वेळी बोलेनच. तो पर्यंत तुम्ही सर्वानी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची नीट काळजी घ्या अशी सूचना राज यांनी कार्यकर्त्यांना केली आहे. 

राज ठाकरेंना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याने आलेल्या मानसिक तणावामधून ठाण्यात एका मनसैनिकाने पेटवून घेत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. प्रवीण चौगुले असे या आत्महत्या करणाऱ्या मनसैनिकाचे नाव आहे. प्रवीण हा ठाण्यातील विटावा परिसरात राहणारा होता. दरम्यान, राज ठाकरे यांना  ईडीने नोटीस बजावल्यानंतर प्रवीणने ईडीविरोधात सोशल मीडियावर अनेक पोस्ट लिहिल्या होत्या. 

यासंदर्भात लोकमतने मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, ''राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्याने आपण टेन्शनमध्ये असल्याचे प्रवीणने आपल्या निकटच्या मित्रांना सांगितले होते. तसेच त्याविरोधात टोकाचे पाऊल उचलणार असल्याचेही तो म्हणाला होता. मात्र मित्रांनी त्याला असे न करण्याचा सल्ला दिला होता. पण मंगळवारी रात्री प्रवीण याने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली.''

टॅग्स :मनसेराज ठाकरेअंमलबजावणी संचालनालय