पक्षांच्या नव्या ३५ प्रजातींनी माहीमच्या उद्यानाचे सौंदर्य बहरले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 05:49 AM2019-01-16T05:49:57+5:302019-01-16T05:50:07+5:30
जगात पक्ष्यांच्या सुमारे ८६०० प्रजाती आहेत. तर भारतात १२०० पेक्षा अधिक पक्षीप्रजाती आढळतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माहीम येथील महाराष्ट्र उद्यानात पक्ष्यांच्या ३५ नव्या प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये १० स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे. २० पक्षीप्रेमींच्या मदतीने नुकतेच या उद्यानात पक्षी निरीक्षण करण्यात आले. यात सचिन राणे व प्रशांत गोकरणकर या पक्षीतज्ज्ञांचा समावेश होता.
लालबुड्या, बुलबुल, नीलकंठी माशिमार, स्वर्गीय नर्तक, नाचण, टिटवी, खंड्या, कवडी मैना, साळुंखी, पोपट, शिंजीर, शिमरी, कोकीळ, भारद्वाज, गायबगळा, लहान बगळा, मध्यम बगळा, कावळा, घार, डोमकावळा, लहान पानकावळा, राखी कोतवाल, शिंपी, राखी बगळा, ढोकरी बगळा, भारतीय हळद्या, रंगीत करकोचा आणि हुदहुद या पक्ष्यांची नोंद झाली. तर स्थलांतरित पक्ष्यांमध्ये पर्ण वटवट्या, ळपोट कुरव, पालासचा कुरव, किवी सूरय, पाणलावा, शेरटा, रोकाट्या, ठीपकेवाला तुतार, टेमिकचा टीलवा, छोटा रेती चिखल्या यांची नोंद झाली, अशी माहिती महाराष्ट्र उद्यान प्रशासनाने दिली.
...म्हणून पक्षी स्थलांतर करतात
जगात पक्ष्यांच्या सुमारे ८६०० प्रजाती आहेत. तर भारतात १२०० पेक्षा अधिक पक्षीप्रजाती आढळतात.
च्पक्ष्यांची थंडी सोसण्याची क्षमता चांगली असते. तरी युरोप, सायबेरियातील हिवाळा आवाक्याबाहेरचा असतो. म्हणून या भागातील पक्षी दक्षिणेकडील उबदार प्रदेशात म्हणजे, उत्तर आफ्रिका, मध्यपूर्व इराण, भारतीय उपखंडात व आग्नेय आशियात स्थलांतर करतात.
च्युरोप व सायबेरियातील उन्हाळ्यामध्ये खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. परिणामी पक्षी पुन्हा सायबेरिया व युरोपात स्थलांतर करतात.