मुंबई : महावितरण भांडुप परिमंडळाकडून ६४,९२४ नवीन वीज जोडण्या एप्रिल २०२० ते मार्च २०२१ दरम्यान कार्यान्वित करण्यात आल्या. सध्या आवश्यक प्रमाणात वीज मीटर उपलब्ध असून, चालू महिन्यातही मुख्यालयाकडून नवीन मीटर पुरविण्याचे नियोजन केले आहे. १५ हजार प्रलंबित वीज जोडण्या या महिन्यात देण्यात येतील.
...................................................
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा
मुंबई : दिल्ली येथे २ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेतील वक्तव्यामुळे मुस्लीम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. एका संस्थेच्या पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरुन ही कारवाई करण्यात आली. पोलीस अधिक तपास करत आहेत.
-------------------------------------
कारवाईला विरोध; पादचाऱ्यावर गुन्हा
मुंबई : विनामास्क फिरताना पोलिसांनी केलेल्या कारवाईला विरोध करणाऱ्या पादचाऱ्याविरुद्ध भाेईवाडा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सुरेंद्र बेडसा असे तरुणाचे नाव असून तो परळचा रहिवासी आहे. त्याने पोलिसांना धक्काबुकी करण्याचा प्रयत्न केला हाेता.
------------------------------
अखेर रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात
मुंबई : मालाड, भंडारवाडा येथील सोमवार बाजार रोडची दुरवस्था झाली हाेती. फाईट फॉर राईट फाउंडेशनचे सचिव मंथन पाटील यांनी मनपा तसेच आपले सरकार या पोर्टलवर तक्रार करून रस्ता दुरुस्तीची मागणी केली. अखेर पालिकेने दुरुस्ती काम सुरू केले आहे.
------------------------------
बंद दिव्यांमुळे अपघातची भीती
मुंबई : सायन-पनवेल मार्गावर चेंबूरच्या सुमन नगर ते उमरशी बाप्पा चौकादरम्यान काही दिवे बंद आहेत.अंधारामुळे अपघात घडत आहेत. या मार्गावरील दिवे तातडीने सुरू करण्याची मागणी पादचाऱ्यांसह वाहनचालकांनी केली.
----------------------
रस्ता रुंदीकरणात झाडाचा बळी
मुंबई : मालाड पश्चिमेकडील लिबर्टी गार्डन येथील अदानी बिल भरणा सेंटर शेजारील पालिकेच्या घनकचरा खात्याची चौकी तोडून रस्ता रुंदीकरण करण्यात आले. या कामात अडसर ठरणारे झाड कापण्यात आले. याप्रकरणी कारवाईची मागणी फाईट फॉर राईट फाउंडेशने केली आहे.
------------------------------