मुंबई विद्यापीठात नवी ७१ महाविद्यालये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 06:20 AM2018-09-22T06:20:55+5:302018-09-22T06:21:09+5:30
मुंबई विद्यापीठाच्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या बृहत आराखड्याच्या गोषवाऱ्यात सुमारे ७१ नवीन महाविद्यालये प्रस्तावित आहेत.
- सीमा महांगडे
मुंबई : मुंबईविद्यापीठाच्या २०१९-२० या शैक्षणिक वर्षाच्या बृहत आराखड्याच्या गोषवाऱ्यात सुमारे ७१ नवीन महाविद्यालये प्रस्तावित आहेत. यातील ९ मुंबईत, ६ मुंबई उपनगरात तर इतर ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे प्रस्तावित आहेत. सर्व अकृषी विद्यापीठांच्या बृहत आराखाड्यावर चर्चा करण्यासाठी नुकतीच राज्य उच्च शिक्षण आणि विकास परिषदेची बैठक पार पडली. त्याच्या इतिवृत्तात ही नवीन महाविद्यालये प्रस्तावित करण्यात आली. या महाविद्यालयांसाठी विद्यापीठाने शैक्षणिक संस्थांकडून आॅनलाइन प्रस्ताव मागवले असून त्याची मुदत २९ सप्टेंबरपर्यंत आहे.
शैक्षणिक संस्थांनी आपल्या अर्जासह तेथील पायाभूत सुविधांच्या माहितीची सीडी २९ सप्टेंबरला विद्यापीठाकडे सुपुर्द करण्याच्या सूचना प्रभारी कुलसचिव सुनील भिरूड यांनी दिल्या आहेत. मुंबईत प्रस्तावित ९ महाविद्यालये मुंबई, दादर, शिवडी, धारावी, वडाळा येथे तर मुंबई उपनगरातील महाविद्यालये कुर्ला, अंधेरी, बोरीवली, मुलुंड येथे प्रस्तावित आहेत. ठाणे जिल्ह्यात, विशेषत: कल्याणमधील ग्रामीण भागात व भिवंडी तालुक्यात विधि, आर्किटेक्चर व फार्मसी महाविद्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत.
प्रत्येक विद्यापीठ आपल्या कक्षा रुंदावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शिक्षण मिळावे यासाठी बृहत आराखडा तयार करत असते. २०१९-२० या वर्षात मुंबई विद्यापीठात आटर््स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालयांसह कौशल्याधारित, शारीरिक शिक्षण, वास्तुशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, सामाजिक शास्त्र, यांची महाविद्यालये प्रस्तावित आहेत. मुंबई विद्यापीठाने कला, वाणिज्य, विज्ञान शाखांच्या पदवी, पदव्युत्तर शाखांनाही परवानगी दिली आहे.
>...त्यानंतरच परवानगी
मुंबई शहरात मुलींसाठी ३ महाविद्यालये तसेच ३ रात्र महाविद्यालयांची शिफारस करण्यात आली आहे. अभ्यासक्रमासाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधांची पाहणी विद्यापीठाकडून केली जाणार आहे. यात महाविद्यालयांसाठी अपेक्षित जागा, इमारत, विद्यार्थ्यांची संभाव्य संख्या आदी बाबींचा तपशील पाहून अंतरिम परवानगी देण्यात येईल, अशी माहितीही विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.