Join us

दर सहाव्या दिवशी नवेकोरे विमान; एअर इंडियाची घोषणा, शानदार सोहळ्यात विमानाचे नवे डिझाइन सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 7:41 AM

एअर इंडिया एक्स्प्रेस ही एअर इंडिया समूहाची बजेट एअरलाइन कंपनी म्हणून ओळखली जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील सर्वात जुनी विमान कंपनी अशी ओळख असलेल्या एअर इंडिया कंपनीच्या ताफ्यात आतापासून २०२४ च्या शेवटापर्यंत प्रत्येक सहाव्या दिवशी नवे विमान दाखल होणार असल्याची घोषणा कंपनीचे अध्यक्ष विल्सन कॅम्बेल यांनी केली. एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपनीच्या नव्या डिझाइनच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. 

एअर इंडिया एक्स्प्रेस ही एअर इंडिया समूहाची बजेट एअरलाइन कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनीच्या या विमानांचा कायाकल्प करण्यात आला असून बुधवारी रात्री मुंबईत झालेल्या एका शानदार सोहळ्यात कंपनीच्या विमानाचे नवे डिझाइन, लोगो सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधत कंपनीने बोईंग कंपनीकडून घेतलेले ७३७-८ हे नवेकोरे विमान सादर केले.

बोईंग व एअरबस अशा दोन्ही कंपन्यांकडून एअर इंडिया समूहाने नव्या विमानांची खरेदी केली आहे. 

 मार्च २०२४ पर्यंत कंपनीच्या ताफ्यात ७४ विमाने असतील. त्यात एअरबसकडून मिळणाऱ्या ए ३२० जातीच्या २८ विमानांचा समावेश आहे. 

 आगामी १५ महिन्यांत कंपनीच्या ताफ्यात आणखी नवी ५० विमाने दाखल होणार आहेत. 

विमानावर बांधणी, पटोला, कांजीवरमडिझाइनचा कायाकल्प करताना कंपनीने आपल्या विमानांचे डिझाइन संपूर्णपणे बदलले आहे. विमानाच्या शेपटीवर भारतीय संस्कृतीची ओळख सांगणाऱ्या विविध गोष्टी साकारण्यात येणार आहेत. यामध्ये काही विमानांच्या शेपटीवर बांधणीची नक्षी असेल तर पटोला, कांजीवरम आदी नक्षीकामही आगामी काळात विमानांवर दिसणार आहे.

कंपनीच्या कालिना येथील व्हीआयपी हँगरमध्ये झालेल्या या सोहळ्यात उपस्थितांना हँगरवर उभे केलेले नवे कोरे विमान दाखविण्यात आले.

एअर इंडिया कंपनी आपल्या समुहातील सर्व विमानांसह २६ टक्क्यांची हिस्सेदारी राखून आहे. ही हस्सेदारी वाढविण्याकडे कंपनीचा कल असेल असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :एअर इंडियाटाटा