मुंबई : मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीने एड्स रुग्णांसाठी नवी रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या सेवेमुळे थेट एड्स रुग्ण राहत असलेल्या ठिकाणी जाऊन ही रुग्णवाहिका रुग्णांची तपासणी करेल.इंडियन आॅइल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या सीआरएस निधीतून या मोबाइल रुग्णवाहिका सोसायटीसाठीच्या सेवेसाठी उपलब्ध झाल्या आहेत. या रुग्णवाहिकेच्या सेवेपूर्वी सोसायटीने काही बसेसच्या माध्यमातून झोपडपट्टीत जाऊन एड्स रुग्णांसाठी वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले आहे. मात्र, बऱ्याचदा झोपडपट्टीसारख्या विभागात अरुंद रस्ते असल्याने बस पोहोचू शकत नाही. यावर उपाय म्हणून आता या रुग्णवाहिका अशा परिसरात जातील.नव्या मोबाइल वैद्यकीय व्हॅनमध्ये दर महिन्याला सकाळी आणि सायंकाळी आरोग्य शिबिरांचेदेखील आयोजन करण्यात येणार आहे. रुग्णांसाठीच्या सर्व मूलभूत सेवासुविधाही या रुग्णवाहिकेत उपलब्ध असतील. याशिवाय डॉक्टर, वैद्यकीय प्रयोगशाळा आणि समुपदेशकांसाठी विशेष विभागदेखील असेल. रुग्णवाहिकेद्वारे टीव्हीच्या माध्यमातून सतत एड्सविषयक जनजागृतीपर संदेशही दाखविण्यात येतील.>अरुंद परिसरासाठी उपयोगीनॅकोच्या माध्यमातून पहिल्यांदाच एड्स कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या रुग्णवाहिकेसाठी जवळपास वीस लाख रुपयांचा खर्च आहे. शहर-उपनगरातील सर्व झोपडपट्ट्या आणि वस्तींमध्ये या रुग्णवाहिका सेवा पुरवितील. कामाठीपुरा, ग्रँट रोड, गोरेगाव, मालाड या विभागातही रुग्णवाहिका सेवा देईल. अरुंद मार्गावरील परिसरात सेवा देण्यासाठी ही रुग्णवाहिका सेवा उपयोगी ठरणार आहे.- डॉ. श्रीकला आचार्य, प्रकल्प संचालक,मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटी
एड्स रुग्णांसाठी नवी रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 6:34 AM