लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात नवा शस्त्रसंधी करार झाला असला तरी पाकिस्तान त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. परंतु दहशतवादी हल्ले व घुसखोरी असे काही झाल्यास भारतदेखील शस्त्रसंधी धुडकावून लावेल. असा स्पष्ट इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. २००३ मध्येही शस्त्रसंधी करार झाला होता. मात्र पाकिस्तानकडून त्याचे अनेकदा उल्लंघन झाले. या नव्या शस्त्रसंधी करारामुळे पाकिस्तानला सुधारण्याची संधीच भारताने दिलेली आहे, असे मत निवृत्त ब्रिगेडियर हेमत महाजन यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन व्याख्यानात ते बोलत होते. भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी, एफएटीएफ आणि चीन संबंधातील ब्रह्मपुत्रा नदीवरील धरण, ब्रिक्स बैठकीच्या निमित्त असलेल्या वृत्तांची सत्यता या विषयांचे त्यांनी विश्लेषण केले.
पुढे ते म्हणाले की या नव्या शस्त्रसंधी करारामुळे एलओसीवर वारंवार होणाऱ्या नुकसानीच्या घटनांना आळा बसेल. त्यामुळे सैनिकांचे पडणारे बळी, नागरिकांना होणारा त्रास आता थांबेल. शस्त्रसंधीमुळे तात्पुरती शांतता निर्माण झाली आहे.
याचे कारण दहशतवादी हे पाकिस्तानचे एक शस्त्रच आहे. मागील दोन वर्षांमध्ये पाच हजार वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. त्यात भारताला आपले ४६ जवान गमवावे लागले होते, तर गेल्या दोन महिन्यांमध्ये २९९ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. त्यामुळे ही शस्त्रसंधी किती काळ टिकेल हा प्रश्नच आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सने पाकिस्तानला अजूनही ग्रे यादीत ठेवले आहे. दहशतवाद्यांना होणारा आर्थिक पुरवठा रोखण्याचा त्यांचा हेतू आहे. भारताने विविध देशांची मदत घेऊन हे घडविले आहे. यावेळी एफएटीएफने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकलेले नाही. पाकिस्तानला यासाठी चीन व काही देशांनी मदत केल्याने ते ग्रे लिस्टमध्ये आहेत. ते म्हणाले की, चीन भारताचा एक क्रमांकाचा शत्रू आहे. चीनला रोखायचे असल्यास आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर भर द्यावा लागेल. त्यासाठी संघर्ष करावा लागणार, असे त्यांनी सांगितले.