Join us  

नवा ‘बेस्ट’ आराखडा

By admin | Published: May 26, 2017 4:22 AM

कामगार कपातीची शिफारस करणारा कृती आराखडा वादात सापडला. त्यात हा आराखडा तयार करणारे तत्कालीन महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांची बदली झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कामगार कपातीची शिफारस करणारा कृती आराखडा वादात सापडला. त्यात हा आराखडा तयार करणारे तत्कालीन महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांची बदली झाली. त्यामुळे लांबणीवर पडलेला हा आराखडा आता नव्याने तयार करण्यात येत आहे. यामध्ये कामगारांचा मुद्दा बाजूला ठेवून विविध मार्गाने बचत सुचविण्यात येणार आहे.सध्या चर्चेत असलेल्या कृती आराखड्यात कामगारांना सक्तीची स्वेच्छानिवृत्ती, विविध भत्त्यांमध्ये कपात अशा काही शिफारशी करण्यात आल्या आहेत. असे बदल करताना बी.आर.आय. कायद्यानुसार बेस्टमधील मान्यताप्राप्त संघटनेला ‘चेंज आॅफ नोटीस’ देऊन त्यांच्याशी चर्चा करणे बंधनकारक आहे. मात्र ही चर्चा न करताच प्रशासनाने कृती आराखडा तयार करून त्यात कर्मचारी, अधिकारी यांचे भत्ते गोठवण्याच्या व सोयी-सुविधा कमी करण्याच्या शिफारशी केल्या. यामुळे हा आराखडा अडचणीत आला.हे प्रकरण न्यायालयात गेल्याने कृती आराखड्यातील कामगारांच्या सोयी-सुविधा व भत्यांच्या शिफारशी वगळून बेस्ट उपक्रमाची तूट भरून काढण्यासाठी इतर कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबतच्या शिफारशी असलेला कृती आराखडा आता नव्याने समितीसमोर सादर केला जाणार आहे. या आराखड्यात तोट्यातील बस मार्ग बंद करणे, उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याचे विविध उपाय सुचविण्यात येणार आहेत.असा सुटतोय पगाराचा प्रश्न बेस्टचा कृती आराखडा मंजूर होत नाही तोपर्यंत पालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी लागणारी रक्कम देण्याचे मान्य केले होते. मात्र पालिकेने मदत न केल्याने या महिन्यात बेस्ट आगारामध्ये दररोज जमा होणारे उत्पन्न जमवून पगार दिल्याचे बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी सांगितले.बेस्टचे ३५० ते ४०० मार्ग तोट्यात आहेत. हे मार्ग नगरसेवक आणि आमदार यांच्या मागणीनुसार सुरू करण्यात आले आहेत. हे मार्ग तोट्यात असतानाही नागरिकांच्या सोयीसाठी सुरू ठेवावे लागत आहेत. या तोट्यातील बसमार्गांमधून बेस्टला ४० टक्क्यांहून कमी उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे आपल्या प्रभागात बस मार्ग सुचवायचा असेल तर बेस्टला वाचवण्यासाठी नगरसेवकांनी पालिकेकडून तर आमदारांनी राज्य सरकारकडून बेस्टला आर्थिक निधी मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन कोकीळ यांनी केले आहे. वाहकाविना मिनी वातानुकूलित बस : मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या आर्थिक टंचाईनंतर वातानुकूलित बस बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता दिल्लीजवळील नोएडाच्या धर्तीवर मुंबईत २० ते २२ आसनी छोट्या वातानुकूलित बस सुरू करण्याचा बेस्टचा विचार आहे. मुंबईतील वाहतूककोंडी आणि छोट्या रस्त्यांवरही सहज चालविता येतील, या छोट्या बसेस असणार आहेत. यासाठी वाहकाची गरज भासणार नाही.