मुंबईच्या डबेवाल्यांच्या ताफ्यात नव्या सायकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:06 AM2021-07-15T04:06:14+5:302021-07-15T04:06:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ज्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने घेतली, त्या मुंबईच्या डबेवाल्यांच्या ताफ्यात ...

New bicycles in Mumbai's Dabewala convoy | मुंबईच्या डबेवाल्यांच्या ताफ्यात नव्या सायकली

मुंबईच्या डबेवाल्यांच्या ताफ्यात नव्या सायकली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ज्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने घेतली, त्या मुंबईच्या डबेवाल्यांच्या ताफ्यात आता नव्या सायकल दाखल होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बुधवारी प्रातिनिधिक स्वरूपात चार ज्येष्ठ सभासदांना सायकल वितरित करण्यात आल्या.

कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्यानंतर मुंबईमध्ये डबेवाल्यांची सेवा पुन्हा कार्यरत होत आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून सेवा बंद असल्यामुळे त्यांच्या सायकल वापरासाठी अयोग्य बनल्या आहेत. त्याचा परिणाम कामावर होत असल्याने डबेवाल्यांच्या ताफ्यात एक हजार सायकल नव्याने दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, जयसिंग पिंगळे, अशोक कुंभार, चिंतामण बच्चे, बाळू भालेराव या सभासदांना शरद पवार यांच्या हस्ते सायकल देण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, आमदार रोहित पवार, बेलापूरचे नगरसेवक अमित पाटील उपस्थित होते. पुढील टप्प्यात एक हजार सायकलचे वाटप केले जाणार असल्याची माहिती डबेवाले संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिली.

दरम्यान, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन महाविकास आघाडी सरकारने दिले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन निवेदन दिले जाईल, असे डबेवाले मंडळाचे अध्यक्ष रामदास करवंदे यांनी सांगितले.

........

डबेवाल्यांकडून प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी - पवार

महादू हावजी बच्चे यांनी १८९० साली मुंबईत काम करणाऱ्या सामान्यवर्गासाठी जेवणाचे डबे पोहोचविण्याचा उपक्रम कुलाबा येथे सुरू केला. आजमितीस सुमारे २ लाख नोकरदार, कामगार, मुले यांना डबा पोहोचविण्याचे कार्य ही संघटना करत आहे. वक्तशीरपणा, सातत्य, समन्वय आणि सेवाभाव ह्या गुणांचा मिलाप असणाऱ्या संघटनेकडून खूप काही शिकायला मिळते. इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी भारतात येऊन डबेवाल्यांचे कौतुक केले. शतकाहून अधिक काळाच्या अनुभवाची शिदोरी पाठीशी असलेल्या संघटनेची बदलत्या काळातही वृद्धी आणि समृद्धी होत राहो, याकरिता डबेवाला संघटनेला माझ्या शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

....

फोटो ओळ - मुंबईच्या डबेवाल्यांच्या ताफ्यात नव्या सायकली दाखल झाल्या आहेत. बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचे वितरण करण्यात आले.

Web Title: New bicycles in Mumbai's Dabewala convoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.