विद्यार्थ्यांच्या हातात पडणार नवी कोरी पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:10 AM2021-09-04T04:10:32+5:302021-09-04T04:10:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आतापर्यंत बहुतांश विद्यार्थी जुन्या पुस्तकांच्या आधारेच सेतू उजळणी करत होते; मात्र नवीन अभ्यासक्रमाचा ...

New blank books will fall into the hands of students | विद्यार्थ्यांच्या हातात पडणार नवी कोरी पुस्तके

विद्यार्थ्यांच्या हातात पडणार नवी कोरी पुस्तके

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आतापर्यंत बहुतांश विद्यार्थी जुन्या पुस्तकांच्या आधारेच सेतू उजळणी करत होते; मात्र नवीन अभ्यासक्रमाचा श्रीगणेशा झाल्याने शाळांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांनी केलेल्या मागणीचा पुरवठाही पूर्ण झाला आहे. मुंबई विभागातील पश्चिम, उत्तर आणि दक्षिण विभागातील सर्व शाळांना मागणीप्रमाणे जवळपास ९५ टक्के पुस्तकांचा पुरवठा पूर्ण करण्यात आला आहे.

शाळा बंद असल्याने आणि अनेक विद्यार्थी, पालक अद्यापही गावी असल्याने विद्यार्थ्यांना पोहोचलेल्या पुस्तकाची पूर्ण नोंद अद्याप बाकी असली तरी अभ्यासासाठी विद्यार्थ्यांच्या हाती नवी कोरी पुस्तके पडण्याची तयारी मात्र झाली आहे.

राज्य शासनाकडून समग्र शिक्षा अभियानांतर्गत शासकीय व अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येतात. यामध्ये मराठी, हिंदी आणि उर्दू आणि सेमी इंग्लिश माध्यमांच्या अनुदानित शाळांचा समावेश असतो. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके पडतील, अशी व्यवस्थाही केली जाते. त्यासाठी दरवर्षी मे महिन्यात पुस्तकांची मागणी करून पाठ्यपुस्तक मंडळाकडे नोंदणी केली जाते.

गेल्या वर्षी शाळा सुरू झाल्या नाहीत, तरीही जून व जुलै महिन्यातच विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके पुरविण्यात आली होती. ती पुस्तके सुस्थितीत असतील, असे गृहीत धरून यंदा सुस्थितीतील पुस्तके पुनर्वापर करण्याचा निर्णय पाठ्यपुस्तक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार, पुस्तकांची मागणी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या होत्या. यंदा छपाई प्रक्रियेत ही बऱ्याच अडचणी आल्याने पाठ्यपुस्तकाची मागणी करूनही बालभारतीकडून पुरवठ्यासाठी उशीर झाला; मात्र आता मुंबई विभागातील पुरवठा तरी मागणीप्रमाणे पूर्ण झाल्याची माहिती समग्र शिक्षा अभियानांतर्गत अधिकाऱ्यांनी दिली आहे.

यंदा मुंबई पश्चिम विभागातून ६ लाख ५८ हजार ५४४ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. दक्षिण बृहन्मुंबई शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून ४ लाख ३६ हजार ५२४ पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. तर उत्तर विभागातून ४ लाख ९९ हजार ५९० पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. या सर्व विभागांना आवश्यकतेप्रमाणे शाळांत पुस्तक पुरवठा करण्यात आला आहे. जशा शाळा सुरू होतील किंवा विद्यार्थी पालक शाळांमध्ये पुस्तकांसाठी उपलब्ध होऊ शकतील, तशी ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती सोपवली जाणार असल्याची महिती देण्यात आली आहे.

--------------------

मुंबई उपसंचालक कार्यालयांतर्गत शाळांना पुरवठा करण्यात आलेली मोफत पुस्तके

विभाग - पुस्तकांची मागणी - बालभारतीकडून प्राप्त पुस्तके - टक्केवारी

उत्तर विभाग - ४९९५९० - ४५४३७४ - ९०. ९८ %

दक्षिण विभाग - ४३६५२४ - ४२५१९५ - १००%

पश्चिम - ६५८५४४ - ६१३१४१ - ९७%

एकूण - १५९४६५८ - १४९२७१० - ९५. ६६ %

------

Web Title: New blank books will fall into the hands of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.