मुंबई - हायटेक कारभार सुरू करणाऱ्या मुंबई महापालिकेने सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या अंगिकृत उपक्रम असलेल्या महाआयटीद्वारे मनुष्यबळ सेवा घेतली होती. पुढील एक वर्षासाठी नवीन संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी नुकत्याच निविदा मागविण्यात आल्या आहेत.
महापालिकेने मुख्य ट्विटर खाते तसेच सर्व विभागांशी संबंधित २४ ट्विटर खाती दोन वर्षांपूर्वी सुरू केली. सोशल मीडियावरील खाती सांभाळण्यासाठी महाआयटीद्वारे मनुष्यबळ सेवा तीन वर्षांसाठी घेण्यात आली होती. महापालिकेने तब्बल सहा कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. भाजपने विरोध दर्शवीत लोकायुक्तांकडे जाण्याचा इशारा दिला होता.
या संस्थेने एका उपसंस्थेची नेमणूक केली होती. या संस्थेशी संबंधित एका महिलेने पालिकेच्यावतीने एका नियतकालिकेला मुलाखत दिल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी आयुक्तांकडे करीत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने सोशल मीडिया हाताळण्यासाठी नव्याने निविदा मागविली आहे. तर सध्या कार्यरत असलेल्या संस्थेला दोन कोटी ८५ हजार रुपये मानधन देण्यात आले आहे. या संस्थेची मुदत जुलै २०२२ रोजी संपणार होती.
यासाठी पालिका करते सोशल मीडियाचा वापर...
मुख्य ट्विटर हॅन्डल्ससह ट्विटर खात्यांवर नागरिकांना तक्रार करता यावी, यासाठी महापालिकेने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार रस्त्यावर पडलेले खड्डे, न उचललेला कचरा, भंगार साहित्य, अनधिकृत होर्डिंग अशा स्वरूपाच्या असंख्य तक्रारी या खात्यांवर करता येतात.