३ वर्षांत वसई खाडीवर नवा पूल; प. रेल्वेच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी कंत्राटदाराची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 09:07 IST2025-02-10T09:06:51+5:302025-02-10T09:07:08+5:30
भाईंदर व नायगाव स्थानकांदरम्यानच्या खाडीपुलावर उभारण्यात येणाऱ्या दोन महत्त्वाच्या पुलांसाठी कंत्राटदार निश्चित करण्यात आल्याने प्रकल्पासाठी हा महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे

३ वर्षांत वसई खाडीवर नवा पूल; प. रेल्वेच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी कंत्राटदाराची नियुक्ती
मुंबई : पश्चिम रेल्वेवर बोरिवली- विरारदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी वसई खाडीवरील पूल क्रमांक ७३ आणि ७५च्या बांधकामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. भाईंदर आणि नायगाव स्थानकांदरम्यान या पुलांची उभारणी करण्यात येणार आहे. हे काम ३६ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) मार्फत बोरिवली आणि विरारदरम्यान २६ किमीची पाचवी आणि सहावी मार्गिका तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी भाईंदर व नायगाव स्थानकांदरम्यानच्या खाडीपुलावर उभारण्यात येणाऱ्या दोन महत्त्वाच्या पुलांसाठी कंत्राटदार निश्चित करण्यात आल्याने प्रकल्पासाठी हा महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे. तसेच उर्वरित सर्व पुलांसाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बोरिवलीपर्यंत विस्तार
पश्चिम रेल्वेमार्फत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. सध्या खार आणि कांदिवलीदरम्यान सहावी मार्गिका तयार आहे, तर तिचे विस्तारीकरण वर्षअखेर बोरिवलीपर्यंत करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्यात बोरिवली ते विरारदरम्यान या प्रकल्पाचे काम एमआरव्हीसीच्या माध्यमातून करण्यात येईल. या टप्प्याचे काम ‘एमयूटीपी ३ अ’ प्रकल्पातंर्गत करण्यात येणार आहे. बोरिवली-विरारसाठी २ हजार १८४ कोटी रुपये खर्च येणार आहे.
खारफुटीची लागवड
खारफुटीच्या बदल्यात खारफुटीची लागवड पूर्ण केल्यानंतरच या प्रकल्पासाठी खारफुटी कापली जाईल या अटीवर तिथे काम करण्यास परवानगी दिली. ही लागवड वनविभागाच्या खारफुटी कक्षामार्फत करायची आहे. डिसेंबर २०२४ पासून लागवडीचे काम सुरू आहे. येत्या तीन महिन्यांत ते पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे एमआरव्हीसीतील रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच सद्य:स्थितीत प्रकल्पाचे काम १० टक्के पूर्ण झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.