मुंबई : चीन आणि पाकिस्तानची युती, त्यांच्यातील वाढते सहकार्य भारतासाठी चिंतेचा विषय आहे. पूर्वी पाकिस्तानी नौदलाच्या क्षमता मर्यादित होत्या. आता त्यात वाढ होत आहे. सगळीकडून मिळणाऱ्या युद्धनौका, हेलिकॉप्टर्स यांची भर पडत आहे. या सर्व बाबींचा विचार आपले धोरण ठरविताना करावा लागेल, असे मत भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल अजेंद्र बहादुर सिंह यांनी शुक्रवारी व्यक्त केले.नौदल सप्ताहाच्या निमित्त आयोजित आपल्या वार्षिक पत्रकार परिषदेत व्हाईस ॲडमिरल एबी सिंह यांनी चीन आणि पाकिस्तान दरम्यान वाढते परस्पर सहकार्य, सागरी मार्गाने होणारी अमली पदार्थांची तस्करी, कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरीयंटचे नवे आव्हान तसेच भारतीय नौदलाची युद्धसज्जता आदी विषयांवर भाष्य केले. भारतीय युद्धनौका आयएनएस कोलकत्तावरून बोलताना एबी सिंह म्हणाले की, संरक्षण आणि सामरिक दृष्टिकोनातून हिंद आणि प्रशांत महासागर क्षेत्राचे महत्व वाढले आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर नौदलाचा वावर ठेवण्याचे धोरण कायम ठेवले जाणार आहे. राष्ट्रीय हित हेच आमचे लक्ष्य आहे. या आघाडीवर आमच्यावर संघर्ष थोपविला गेला तर निर्णाय विजयाच्या दृष्टीने कारवाई केली जाईल, असा इशारा व्हाईस ॲडमिरल सिंह यांनी दिला.अमली पदार्थांचा जो धोका आहे त्यात पाकिस्तानचा मोठा हात आहे. अमली पदार्थांच्या तस्करीचे स्वरूप बदलले आहे. आजवर भूमार्गाने जो व्यापार चालायचा आता त्यासाठी सागरी मार्गांचा वापर केला जात आहे. त्यासाठी पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर छोट्या इराणी जहाजांचा वापर केला जात आहे. अमली पदार्थांच्या व्यापारातून आलेला पैसा हा दहशतवादी कारवायांसाठीच वापरला जातो यात कोणतीच शंका नाही. मात्र, टेहळणी, माहितीच्या आधारावर याविरोधात आवश्यक कारवाई केली जात असल्याचे व्हाईस ॲडमिरल सिंह यांनी स्पष्ट केले.
‘अमली पदार्थांच्या विरोधात विविध देशांशी समन्वय’अमली पदार्थांच्या विरोधात विविध देशांशी नौदलांमध्ये समन्वय आहे. देशांतर्गत विविध यंत्रणांमध्ये समन्वय असून एकसंघपणे याविरोधात काम केले जात असल्याचेही ॲडमिरल सिंह यांनी सांगितले. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरीयंटच्या आव्हानाला समोरे जाण्यासाठी नौदल सज्ज असल्याचे सांगून एबी सिंह म्हणाले की, नागरी प्रशासनाची शक्य तितकी मदत करण्याची आमची भूमिका आहे.