नवे मुख्य न्यायाधीश मोटारीने मुंबईत येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 03:37 AM2020-04-26T03:37:00+5:302020-04-26T03:37:52+5:30
‘लॉकडाऊन’मुळे सर्व विमाने व रेल्वे बंद असल्याने न्या. दत्ता यांना या खडतर प्रवासाशिवाय अन्य पर्याय नाही.
कोलकाता : मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून रुजू होण्यासाठी न्या. दीपंकर दत्ता कोलकत्याहून सुमारे दोन हजार कि.मी. प्रवास मोटारीने करून रस्ता मार्गाने मुंबईत येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. ‘लॉकडाऊन’मुळे सर्व विमाने व रेल्वे बंद असल्याने न्या. दत्ता यांना या खडतर प्रवासाशिवाय अन्य पर्याय नाही.
न्या. दत्ता यांचा येत्या मंगळवारी २८ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे ४५ वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथविधी होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियम’ने गेल्या आठवड्यात केलेली शिफारस मान्य करून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्या. दत्ता यांची या पदावर शुक्रवारी रात्री नेमणूक केली. सध्याचे मुख्य न्यायाधीश न्या. भूषण धर्माधिकारी २७ एप्रिल रोजी सायंकाळी सेवानिवृत्त होत आहेत. न्या. दत्ता सध्या कोलकता उच्च न्यायालयात सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. वयाने ५५ वर्षांचे असलेले न्या. दत्ता मुंबई उच्च न्यायालयाचे आजवरचे सर्वात तरुण मुख्य न्यायाधीश असतील. एवढेच नव्हे तर उच्च न्यायालयातील सध्याच्या ६९ पैकी तब्बल ५४ न्यायाधीशांहून ते वयाने तरुण असतील.