Join us

नवीन नोटेचा रंग जात असल्याने पोलिसांत तक्रार

By admin | Published: November 16, 2016 4:32 AM

भारतीय चलनी दोन हजारांच्या नोटेचा रंग जात असल्याची लेखी तक्रार ठाण्यातील समाजसेवक विक्रांत कर्णिक यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात

ठाणे : भारतीय चलनी दोन हजारांच्या नोटेचा रंग जात असल्याची लेखी तक्रार ठाण्यातील समाजसेवक विक्रांत कर्णिक यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. ही तक्रार देताना, त्यांनी ती नोट आणि त्या नोटेचा रंग लागलेला रुमाल चौकशीसाठी पोलिसांच्या हवाली केला आहे. मात्र, पोलिसांनी हा अर्ज केवळ दाखल करून घेतला आहे.नौपाडा, घंटाळी देवी पथ येथे राहणारे कर्णिक यांना त्यांचे बाळकूम येथील मित्र अजय जया हा काही कामानिमित्त ठाण्यात आले असताना, सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता त्यांना भेटले. याचदरम्यान, हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोट असून त्या मार्केटमध्ये कोणी घेत नसल्याचे सांगून त्यांच्याकडे नवीन चलनी नोटेची मागणी केली. त्यावेळी त्याने ए.डब्ल्यू ४४७२७८ या क्रमांकाची २ हजारांची नवीन नोट दिल्याचे कर्णिकांनी स्पष्ट केले. मात्र, ती नोट पॅन्टचे खिशात ठेवली असता, अशा नोटांचा रंग जात असल्याचे बातम्या आणि ऐकीव माहितीवरून शहानिशा करण्याकरिता माझ्याकडील नवीन नोट रुमालाने पुसून पाहिली. त्यावेळी त्या नोटाचा रंग रुमालाला लागल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मला देण्यात आलेली नोट ही खरी आहे कि खोटी आहे. तसेच नोट खरी असल्यास तिचेवरील रंगाचा दर्जा हा दुय्यम प्रतीचा आहे का असे प्रश्न पडल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत पडताळणी होण्यासाठी तसेच संबंधितावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे असल्याने तक्रार लेखी अर्जाद्वारे केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)