मुंबई: स्वच्छ, सुंदर, हरित मुंबईसाठी आता नवीन आयुक्तही रस्त्यावर उतरणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर दोन आठवडे विविध खात्यांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर आयुक्त भूषण गगराणी शनिवारी ‘डीप क्लीन’ मोहिमेत सहभागी होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून स्वच्छ मुंबई मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम सुरू होऊन जवळपास १८ आठवडे उलटले आहेत. रस्ते धुणे, कचरा गोळा करणे, राडारोडा उचलणे आदी कामे या मोहिमेच्या माध्यमातून केली जातात. त्यासाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. आपापल्या विभागात किती वेळ कामावर देखरेख ठेवावी, याची वेळही निश्चित करण्यात आली आहे. दर शनिवारी मुख्यमंत्री स्वत: रस्त्यावर उतरून कामाची पाहणी करतात, मोहिमेचा आढावा घेतात.
सध्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मुख्यमंत्र्यांना या मोहिमेत सहभागी होता येत नाही. आयुक्तपदी इकबाल सिंह चहल असताना तेही मुख्यमंत्र्यांसोबत मोहिमेत सहभागी होत होते. त्यांची बदली झाल्यानंतर गगराणी यांच्याकडे आयुक्तपदाची जबाबदारी आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्यांनी विविध प्रकल्पांचा तसेच पालिकेच्या अन्य कामाचा आढावा घेतला. त्यानंतर आता तेही या मोहिमेत सहभागी होणार आहेत.
येथून मोहिमेला प्रारंभशनिवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून आयुक्त गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत सखोल स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. कुलाबा येथील प्रकाश पेठे मार्ग येथून मोहिमेला सुरुवात होईल. पहिली अग्यारी गल्ली, (सी विभाग), लीलावती रुग्णालय (वांद्रे, पश्चिम), प्रभात कॉलनी, स्टेशन परिसर (सांताक्रूझ पूर्व), साकी विहार रस्ता, मुख्य रस्ता, (एल विभाग), हिरानंदानी जंक्शन, डी मार्ट, (एस विभाग) या ठिकाणी आयुक्त भेटी देतील.