नवे आयुक्त नव्या वर्षातच ?
By admin | Published: December 14, 2015 02:12 AM2015-12-14T02:12:19+5:302015-12-14T02:12:19+5:30
तीन महिन्यांपूर्वी मुंबई पोलीस आयुक्त झालेल्या अहमद जावेद यांची सौदी अरबियाच्या राजदूतपदी नियुक्ती झाली. आता त्यांच्यानंतर या पदावर कोणाची नियुक्ती होणार
जमीर काझी, मुंबई
तीन महिन्यांपूर्वी मुंबई पोलीस आयुक्त झालेल्या अहमद जावेद यांची सौदी अरबियाच्या राजदूतपदी नियुक्ती झाली. आता त्यांच्यानंतर या पदावर कोणाची नियुक्ती होणार, याबाबत उत्सुकता लागली आहे. असे असले तरी त्यासाठी नव्या वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत. जानेवारीच्या अखेरीस जावेद सेवानिवृत्त होणार आहेत. तरीदेखील जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात त्याबाबतची घोषणा केली जाईल, असे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
सध्या सुरू असलेले हिवाळी अधिवेशन २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. तोपर्यंत आणि त्यानंतर ‘थर्टी फर्स्ट’ची धामधूम सुरू राहणार आहे. त्यामुळे आयुक्तपदाची धुरा जावेद यांच्याकडे कायम ठेवली जाईल. त्याचप्रमाणे आयुक्तपदाचा दर्जा डीजीपीऐवजी पुन्हा पदावनत (डाऊनग्रेड) करण्यात येईल, असेही विभागाच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
आयुक्तपदाची धुरा सोपविलेल्या अहमद जावेद हे नव्या वर्षात ३१ जानेवारीला निवृत्त होत आहेत. या नियुक्तीसाठी आयुक्तपद ‘अपग्रेड’ करून महासंचालक (डीजी) दर्जाचे करण्यात आले. त्यामुळे डीजींच्या सहा पदांची मंजुरी असताना आणखी एक पद वाढले होते. या नियुक्तीमुळे डीजी दर्जाचे वाढलेले एक पद के. पी. रघुवंशी सेवानिवृत्त झाल्यानंतर सुरक्षा महामंडळाचे पद डाऊन ग्र्रेड करून पदे पुन्हा पूर्ववत सहा करण्यात आली. जावेद यांच्यानंतर पुन्हा आयुक्तपदावर महासंचालकांऐवजी अपर महासंचालक दर्जाचा अधिकारी नेमण्यावर भर राहणार आहे. जेणेकरून सिक्युरिटी बोर्ड पुन्हा डीजी दर्जाचे करणे सोयीचे ठरणार असल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यासाठी जावेद यांच्यानंतर मुंबईच्या आयुक्तपदासाठी दत्ता पडसलगीकर किंवा संजय बर्वे यांच्यापैकी एकाची निवड केली जाण्याची शक्यता आहे. पडसलगीकर हे सध्या आयबीमध्ये प्रतिनियुक्तीवर असून, बर्वे एसीबीमध्ये कार्यरत आहेत. जर डीजी दर्जाचा आयुक्त नेमण्याचे ठरले तर सतीश माथूर किंवा मीरा बोरवणकर यापैकी एकाला संधी मिळू शकते.