Join us  

‘तासगावकर’प्रकरणी विद्यापीठाची नव्याने समिती

By admin | Published: February 04, 2015 2:37 AM

कर्जत येथील तासगावकर महाविद्यालयाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने समिती गठित केली होती.

मुंबई : कर्जत येथील तासगावकर महाविद्यालयाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने समिती गठित केली होती. मात्र काही सदस्यांकडून महाविद्यालयाची चौकशी करण्यास नकार मिळाल्याने अखेर विद्यापीठाने मंगळवारी नवीन समिती गठित केली आहे. ही समिती महाविद्यालयाला भेट देऊन दोन दिवसांत अहवाल सादर करणार आहे. दरम्यान, विद्यापीठाने महाविद्यालयाला पाठविलेल्या नोटिसीला महाविद्यालयाकडून कोणतेच उत्तर आलेले नाही.सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे तासगावकर महाविद्यालय गेल्या २५ दिवसांपासून बंद आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार मिळाले नसल्याने त्यांनी काम बंद केले असल्याने मुंबई विद्यापीठाने महाविद्यालय प्रशासनाला ३१ जानेवारीपर्यंत महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश दिले होते, मात्र महाविद्यालय अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांनी सोमवारी मुंबई विद्यापीठाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते.विद्यापीठाने महाविद्यालय बंद प्रकरणाची चौकशी करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेतील सदस्यांची समिती गठित केली होती. या समितीने चौकशी करण्यास नकार दिल्यानंतर विद्यापीठाने नव्याने समिती गठित केली आहे. सात सदस्यीस समिती पुढील दोन दिवसांत आपला अहवाल विद्यापीठाला सादर करणार आहे. यानंतरच विद्यापीठ महाविद्यालयावर कारवाईचा निर्णय घेणार आहे. महाविद्यालय बंद असल्याने विद्यापीठाने महाविद्यालय प्रशासनाकडून अहवाल मागवला होता. मात्र अद्यापपर्यंत महाविद्यालयाकडून अहवाल विद्यापीठाकडे आला नसल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बुधवारी विद्यार्थी प्रतिनिधींची कुलगुरूंसोबत बैठक होणार आहे. (प्रतिनिधी)