Join us

पासिंग अभावी पालिकेच्या नवीन कॉम्पॅक्टर गाड्या गॅरेजमध्ये पडून! पार्लेकर कचर्‍यामुळे हैराण

By मनोहर कुंभेजकर | Published: June 16, 2023 3:23 PM

शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

मुंबई -सुंदर पार्ले, स्वच्छ पार्ले अशी पार्ल्याची ख्याती आहे. मात्र पार्लेकर कचर्‍यामुळे हैराण झाले असून आज कचरामय पार्ले अशी पार्ल्याची स्थिती झाली आहे. आगामी काळात पालिकेने या समस्येवर संपूर्ण विभागासाठी तातडीने मार्ग काढला नाही, तर शिवसेना विभागप्रमुख आमदार अ‍ॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेकडून आंदोलन छेडण्यात  येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डीचोलकर यांनी दिला आहे. कंत्राटदारांच्या फेर्‍या वाढवण्यासाठी हा प्रकार सुरू आहे का असा सवालही त्यांनी केला आहे.

पालिकेच्या विलेपार्ले विभागाच्या सुमारे अठरा लाखांच्या लोकसंख्येमागे पालिकेच्या केवळ दोन-तीन कॉम्पॅक्टर गाड्या सुरू आहेत. विशेष म्हणजे नव्या गाड्या उपलब्ध असताना प्रशासनाने वाहतूक विभागाकडून पासिंग करून घेतल्या नसल्याने या गाड्या पालिकेच्या गॅरेजमध्ये कामाशिवाय उभ्या आहेत. त्यामुळे या गाड्या तातडीने सुरू कराव्यात अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

पालिकेच्या के/पूर्व विभागातील विलेपार्ले (पूर्व) विभागात कचरा उचलण्यासाठी कंत्राटदाराच्या माध्यमातून सुमारे २५ गाड्यांच्या फेर्‍या तर पालिकेकडूनही दहा कॉम्पॅक्टर गाड्या चालवल्या जातात. मात्र सद्यस्थितीत कचरा उचलणाऱ्या पालिकेच्या कॉम्पेक्टरची संख्या केवळ २ ते ३ फेर्‍या होतात. दिवसाला तीन वेळा होणार्‍या फेर्‍या आता एकवर आल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी कचरा पडून राहण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे दुर्गंधी आणि रोगराईची भिती निर्माण झाली असून गेल्या महिनाभरापासून कचरामय पार्ले अशी स्थिती असल्याने पार्लेकर  हैराण झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी उपविभागप्रमुख चंद्रकांत पवार व शाखाप्रमुख प्रकाश सपकाळ यांनी केली आहे.

टॅग्स :मुंबई