मुंबई - १९९३ बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेननला ७ वर्षापूर्वी मुंबईच्या बडा कब्रिस्तान इथं दफन करण्यात आले होते. मात्र त्याच्या कबरीवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. याकूबची कबर मार्बल आणि लायटिंगनं सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यावरून भाजपानं मागील महाविकास आघाडी सरकारला दोषी धरत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
याकूबची कबर सुशोभिकरणासाठी ज्यांनी मदत केली त्यांचे नावे समोर आणा. हे देशद्रोही कृत्य असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. तत्कालीन सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होते. कट्टर हिंदुत्ववादी स्वत:ला म्हणवणारे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी तडजोड का केली? याचं स्पष्टीकरण जनतेला दिले पाहिजे. या प्रकारासाठी सरकारमध्ये कोण कोण समाविष्ट होते ते समोर आले पाहिजे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
याकूब मेननच्या कबर सुशोभिकरणावरुन राज्यात नवा वाद होण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबई पोलीस उपायुक्त याकूब मेमन प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. एल. टी. मार्ग पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक तपास अधिकारी असतील. तसेच वक्फ बोर्ड, महानगरपालिका, चॅरिटी कमिश्नर यांच्याकडूनही सदर प्रकरणाची माहिती घेतली जात आहे.
याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करून त्यावर रोषणाई करण्यात आल्याची बातमी माझानं काल दिली. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या पोलिसांनी याकूबच्या कबरीवरच्या एलईडी लाईट्स हटवल्या आहेत. याकूबच्या कबरीवरची कालपर्यंत दिसणारी रोषणाई आणि आज कारवाईनंतरची कबर अशी दोन दृश्यं आम्ही आपल्याला दाखवतोय. १८ मार्च २०२२ रोजी कबरीवर लाईट्स लावल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आलीय. शब ए बारातच्या दिवशी लाईट्स लावण्यात आल्याची माहिती आहे. या दिवशी लोक पूर्वजांच्या कबरीवर प्रार्थनेसाठी जातात. त्यावेळी कबरीवर लाईट्स लावण्यात आले अशी माहिती तपासात समोर आली आहे.