- चेतन ननावरेमुंबई : राजस्थानमधील करोली येथील राहणाऱ्या सूरज कुमार बैरवा याचा आॅक्टोबर २०१७मध्ये रेल्वेने वल्लभगढहून फरीदाबादला जाताना अपघात झाला. या अपघातात सूरजला दोन्ही पाय गमवावे लागले. त्यानंतर त्याच्या कौटुंबिक आयुष्यात आलेल्या वादळाने आत्महत्या करण्याचा विचार अनेकदा त्याच्या मनात आला. मात्र अपघाताच्या एका वर्षानंतर नारायण सेवा संस्थानमध्ये गेल्यावर कृत्रिम पायाच्या मदतीने शिलाईकाम शिकणारा सूरज आयुष्यात पुन्हा पायावर सक्षमपणे उभा राहत आहे.सूरजने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आॅक्टोबर २०१७मध्ये झालेल्या अपघातात दोन्ही पाय गमावल्यानंतर आभाळ कोसळले होते. अवघ्या ६ वर्षांपूर्वी लग्न झालेली पत्नी चार वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन निघून गेली. कारागीर म्हणून हातावर पोट असल्याने कुटुंब आर्थिक संकटात सापडले. लहान भावासह आई-वडिलांची जबाबदारी उचलण्याऐवजी त्यांच्यावर अवलंबून राहण्याची वेळ माझ्यावर आली. मानसिकदृष्ट्या खचून गेलो होतो. आत्महत्येशिवाय पर्याय नव्हता. तितक्यात एका शुभचिंतकाने नारायण सेवा संस्थानची माहिती दिली आणि अवघे विश्वच बदलल्याचे सूरजने सांगितले.कुबड्यांच्या मदतीने कसातरी नोव्हेंबर २०१८मध्ये संस्थेमध्ये आल्यावर आयुष्याला खरी कलाटणी मिळाल्याचे सूरज सांगतो. संस्थेने मोफत स्वरूपात आर्टिफिशियल लिम्ब (कृत्रिम पाय) लावले. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत अगरवाल यांनी केलेल्या समुपदेशनात स्वयंरोजगाराच्या मदतीने आयुष्यात स्वत:च्या पायावर उभे राहण्याची ताकद दिली. त्यानुसार संस्थेमध्येच तो शिलाईकामाचे प्रशिक्षण घेत आहे. शिलाई मशीनही संस्थेने त्याला कामासाठी मोफत दिली.सक्षम करण्याचा प्रयत्नदेशातील हजारो रुग्णांना आयुष्यात जगण्याची उमेद देण्यासाठी संस्थेतर्फे कृत्रिम पाय व हातासह मोफत स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. उपचार व प्रशिक्षणादरम्यान रुग्णाचा सर्व खर्च संस्था करते. मानसिकदृष्ट्या खचलेल्या रुग्णांनी कोणताही विघातक पर्याय न निवडता आयुष्यात जिद्दीने पुढे जाण्याचे संस्थेचे ध्येय आहे.- प्रशांत अगरवाल, अध्यक्ष - नारायण सेवा संस्थान
दोन्ही पाय गमावलेल्या सूरजच्या आयुष्यात नवी पहाट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 2:57 AM