मुंबई - राज्य सरकारने लागू केलेल्या नव्या एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीमुळे राज्यभरातील परवडणाऱ्या घरांची संख्या दुपटीने वाढेल, तसेच बांधकाम परवानग्यांमध्ये सुसूत्रता आल्याने त्यांचा वेग वाढेल. बांधकामाचा खर्चही कमी होणार असल्याने त्याचा फायदा गृहखरेदीदारांना होईल, असा विश्वास क्रेडाई-एमसीएचआय या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.महाराष्ट्राचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी जारी केलेली नवीन यूडीपीसीआर अधिसूचना राज्यातील गृहखरेदीदार आणि विकासकांसाठी सकारात्मक बदल घडविणारी आहे. विकासकांना मिळालेल्या अतिरिक्त प्रोत्साहनामुळे परवडणाऱ्या घरांच्या गृहप्रकल्पांमध्ये वाढ होईल, असे मत क्रेडाइ एमसीएचआयचे अध्यक्ष दीपक गोराडिया यांनी मांडले. महाराष्ट्रातील लाखो कुटुंबीयांचे स्वतःच्या मालकीचे घर असावे, हे स्वप्न साकार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. इझ ऑफ डुइंग बिझनेसमुळे बांधकामाचा वेगही वाढेल. त्यामुळे विकासक वेळेत घराचे हस्तांतरण करू शकतील. भविष्यातही अशा प्रकारच्या धोरणात्मक उपाययोजनांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या डीसीआरमुळे परवडणाऱ्या घरांची संख्या झाली दुप्पट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 6:23 AM