पूजा दामले, मुंबईबोरीवली मतदारसंघाच्या विकासासाठी योजना आखण्यात आल्या असून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार विनोद तावडे यांच्यातर्फे सांगण्यात आले. या मतदारसंघात अनेक जुन्या चाळी आहेत. जुन्या चाळी पाडून तेथे पुनर्विकासाची कामे सुरू होत आहेत. त्यामुळे पुनर्विकासाचा प्रश्न सध्या आहे. चारकोप येथील सेक्टर ८ आणि ९ येथील इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी येत आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी प्रक्रिया सध्या सुरू आहे. सीआरझेड आणि म्हाडाकडे यासंबंधात पत्रव्यहार सुरू केला असून लवकर हा प्रश्न सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षात कार्यरत असल्यापासून मतदारसंघातील प्रश्नांची जाण आपल्याला असल्याचे तावडे म्हणाले. गोराई, मनोरी आणि एस्सेल वर्ल्ड येथे जेट्टीचे काम सुरू आहे. पण येथील कामे करण्यासाठी सीआरझेडकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. येथील कामांसाठी परवानगी अर्ज केलेला आहे. पुढच्या दोन ते तीन महिन्यांत या परवानग्या मिळतील. त्यानंतर लगेचच कामाची सुरुवात करण्यात येणार आहे. या भागात पूर्वी नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या. पण गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलले आहे. या भागात निवासी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. येथे पुन्हा एकदा नोकरी, व्यवसाय उपलब्ध करून द्यायचा आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. पुढच्या पाच वर्षांत पुन्हा एकदा या भागात नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. बोरीवली मतदारसंघात वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी काम सुरू केलेले आहे. त्यासाठी जागेचा शोध घेतला जात आहे. पश्चिम उपनगरांत वैद्यकीय सेवा चांगल्या पद्धतीने मिळावी, यासाठी याची आवश्यकता आहे. या परिसरात मैदाने आणि तळ्यांच्या सुशोभीकरणाचे काम सुरू केले आहे. यापूर्वी येथील आमदार गोपाळ शेट्टी यांनी उद्यानांचे काम केले होते. त्याबरोबर आता वजिरा नाका, गोल्डन क्रीडा, गावदेवी येथील मैदांनाचा विकास केला जाणार आहे. शिंपोली येथील तळ्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
बोरीवलीमध्ये नव्या विकासकामांना सुरुवात
By admin | Published: November 11, 2015 1:05 AM