*२८ सप्टेंबरला हजर राहण्याची सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पुन्हा नव्याने समन्स बजावले आहे. येत्या २८ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता बेलॉर्ड पियार्ड कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. पहिल्या समन्सवेळी परब यांनी चौकशीला हजर राहणे टाळले होते. त्यामुळे यावेळी ते काय करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारमधील मंत्र्यांची केंद्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी केली जात आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी परिवहनमंत्री परब यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून ईडीकडे तक्रार दिली होती. त्याचप्रमाणे कारमायकल रोडवरील स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याने परब यांनी बीएमसी कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून वसुली करण्याबाबत सूचना केल्याचा आरोप एनआयए कोठडीत असताना पत्राद्वारे केला आहे. त्याअनुषंगाने ईडीने परब यांना २९ ऑगस्टला समन्स बजावून ३१ ऑगस्टला चौकशीला हजर राहण्याची सूचना केली होती. मात्र, त्यांनी नियोजित कार्यक्रमांचे कारण देत जबाब नोंदवण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती. तसेच चौकशी कोणत्या विषयासंबंधी करावयाची आहे, याबद्दल विचारणा केली होती. त्यानुसार ईडीने शुक्रवारी परब यांना दुसरे समन्स बजाविले असून येत्या मंगळवारी सकाळी अकरा वाजता चौकशीला हजर राहण्याची सूचना केली आहे.