Join us

विरार ते डहाणू दरम्यान आता नवीन आठ स्थानके

By admin | Published: February 28, 2015 1:53 AM

रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई शहर आणि उपनगरवासीयांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या एमयूटीपी टप्पा-३ ला मंजुरी देण्यात आली

मुंबई : रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई शहर आणि उपनगरवासीयांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या एमयूटीपी टप्पा-३ ला मंजुरी देण्यात आली. या टप्प्यात विरार ते डहाणू तिसरा-चौथा मार्गही असून यामध्ये तब्बल आठ नवीन स्थानकांचा समावेश आहे. तिसऱ्या-चौथ्या मार्गाचे काम पूर्ण होतानाच ही नवीन स्थानकेही मार्गी लागणार असल्याने या पट्ट्यातील घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चर्चगेट ते विरार या ६0 किलोमीटरच्या पट्ट्यात २८ स्थानके तर विरार ते डहाणू यादेखील ६0 किलोमीटरच्या पट्ट्यात सात स्थानके येतात. विरार ते डहाणू दरम्यान सध्या वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, उमरोळी, बोईसर, वाणगाव या स्थानकांचा समावेश आहे. दोनच मार्ग असलेल्या विरार ते डहाणू दरम्यान तिसरा आणि चौथा मार्ग बनविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून एमयूटीपी-३ मध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) एमयूटीपी-३ प्रकल्प रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आणि रेल्वे अर्थसंकल्पात त्याला मंजुरी देण्यात आली. यामुळे एमयूटीपी-३ मध्ये समावेश असलेल्या विरार ते डहाणू तिसऱ्या आणि चौथ्या मार्गालाही गती मिळणार असून त्याचा खर्च ३ हजार ५५५ कोटी रुपये आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गादरम्यान एमआरव्हीसीकडून आठ नवीन स्थानकांचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वैतरणा ते सफाळे दरम्यान वाधीव आणि सार्तोडी स्थानक, सफाळे आणि केळवे रोड दरम्यान माकुंसार, केळवे रोड ते पालघर दरम्यान चिंटुपाडा, पालघर ते उमरोळी दरम्यान खराळे रोड, उमरोळी ते बोईसर दरम्यान पांचाळी, बोईसर आणि वानगाव दरम्यान वांजरवाडा तसेच वानगाव ते डहाणू दरम्यान बीएसईएस कॉलनी या नवीन स्थानकांचा समावेश असल्याचे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले. विरार ते डहाणू दरम्यान सध्या व्यावसायिक आणि रहिवासी इमारती मोठ्या प्रमाणात उभ्या राहत असून नवीन स्थानके बनल्यास भविष्यात येथील घरांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.