राजू काळे, भार्इंदरमीरा-भार्इंदर पालिकेने ९ महिन्यांपूर्वी भार्इंदर पश्चिमेस नवीन एक मजली अग्निशमन केंद्र बांधले असले तरी ते सध्या बंदावस्थेतच आहे. परिणामी, हे केंद्र सध्या शोभेची वास्तू ठरत आहे.शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. शहराचे क्षेत्रफळ ७९.४० चौरस किमी असून त्यात वास्तव्य करणाऱ्यांची संख्या सुमारे १२ लाखांवर गेली आहे. त्यामुळे येथील पायाभूत सुविधांवर ताण पडतो आहे. हे लक्षात घेऊन काही महत्त्वाकांक्षी योजना शहरात राबविण्यात येत आहेत. त्यातच अत्यावश्यक सेवांपैकी अग्निशमन सेवा वाढत्या लोकवस्तीच्या प्रमाणात तोकडी पडत आहे. दूरवर घडणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाला त्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होण्याचे प्रकार सतत घडत असतात. शहरात सध्या पालिकेची एकूण तीन अग्निशमन केंद्रे कार्यरत असून त्यात भार्इंदर पश्चिमेकडील ६० फुटी मार्गावरील केंद्र, उत्तन व मीरा रोडच्या सिल्व्हर पार्क केंद्राचा समावेश आहे. नवघर येथील नवीन अग्निशमन केंद्राच्या निर्मितीचा निर्णय तत्कालीन महासभेत घेण्यात आला असला तरी या नियोजित केंद्राची जागा सीआरझेडबाधित असल्याने हे केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, पालिकेने भार्इंदर पश्चिमेकडील ख्वाजा गरीब नवाझ मार्गावर नवीन एक मजली अग्निशमन केंद्राची इमारत ९ महिन्यांपूर्वीच बांधून पूर्ण केली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे प्रशासनाने हे केंद्र सुरू करण्यास टाळाटाळ चालवली होती. तद्नंतर, निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने नवीन अग्निशमन केंद्र सुरू करण्याचा मुहूर्त लांबणीवर पडला. त्यातच अग्निशमन दलात पुरेसे बंब नसल्याचे सांगण्यात येऊ लागले. तत्कालीन स्थायी समितीच्या बैठकीत नवीन बंब खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याने काही महिन्यांपूर्वीच ६ बंब खरेदी करण्यात आले आहेत. त्या गाड्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या नोंदणीअभावी अग्निशमन दलात समाविष्ट करण्यात आल्या नसल्याने सध्या त्या धूळ खात पडल्या आहेत. असे असतानाही नव्याने बांधलेले अग्निशमन केंद्र सुरू करण्यास प्रशासनाला अद्यापही मुहूर्त मिळाला नसल्याबाबत नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे.
नवीन अग्निशमन केंद्र अद्यापही बंदच
By admin | Published: November 03, 2014 12:15 AM