Join us

दक्षिण मुंबईत पाणी तुंबण्याची नवीन ठिकाणे वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:05 AM

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत शंभर टक्क्यांहून अधिक नालेसफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. मात्र, या कालावधीत ...

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत शंभर टक्क्यांहून अधिक नालेसफाई झाल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. मात्र, या कालावधीत मुंबईत पावसाचे पाणी तुंबण्याच्या ठिकाणांमध्ये वाढ झाली आहे. विशेषकरून दक्षिण मुंबईत पाणी तुंबण्याची नवीन ठिकाणे तयार झाली आहेत.

गेल्यावर्षी पावसाळ्यात मंत्रालय, मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय, गिरगाव चौपाटी अशा भागांतही पावसाचे पाणी साचले होते. ज्या ठिकाणी यापूर्वी कधीही पाणी भरत नव्हते, अशा ठिकाणीही गेल्या दोन वर्षांत पावसाचे पाणी साचू लागले आहे. त्यामुळे एकीकडे नालेसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तरी गेल्या दोन वर्षांत मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या विकासकामांमुळे पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत असल्याची नाराजी स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात दक्षिण मुंबईत चार तासांत सरासरी ३०० मिलिमीटर पाऊस पडल्यामुळे पाणी भरले होते. मंत्रालय, ओव्हल मैदानाचा परिसर, नरिमन पॉइंट, मरिन ड्राइव्ह या परिसरातही कधी नव्हे ते पाणी भरले होते. गेल्यावर्षीच्या अनुभवानंतर पालिकेने वर्षभरात विविध उपाययोजना केल्या. यापैकी काही ठिकाणी यंदाच्या पावसाळ्यात अद्याप पाणी भरलेले नाही.

या भागांना दिलासा

गिरगाव चौपाटी, बाबूलनाथ, नेपियन्सी रोड, मंत्रालय, नरिमन पॉइंट अशा काही परिसरांना यावर्षी दिलासा मिळाला आहे.

त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास विलंब

२६ जुलै २००५ च्या पावसानंतर पालिकेने ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पांतर्गत हाजी अली, ब्रिटानिया, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलॅण्ड, ईर्ला ही उदंचन केंद्रे उभारली आहे. तसेच पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमताही वाढवण्यात आली. मात्र गेल्या दोन वर्षांत मुंबईत सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे अनेक ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्यांना धक्का लागला आहे, तर काही ठिकाणी बांधकामाचा राडारोडा अडकल्यामुळे पर्जन्य जलवाहिन्या बुजल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.