Join us

नव्या पिढीला आंबेडकरवाद कळलाच नाही

By admin | Published: January 05, 2016 2:39 AM

आरक्षणानंतर सुस्थापित झालेल्या वर्गाने आपल्या पुढच्या पिढीला आपल्या संघर्षाचा इतिहासच सांगितला नाही. त्यामुळे त्यांना आंबेडकरवाद कळलाच नाही

मुंबई : आरक्षणानंतर सुस्थापित झालेल्या वर्गाने आपल्या पुढच्या पिढीला आपल्या संघर्षाचा इतिहासच सांगितला नाही. त्यामुळे त्यांना आंबेडकरवाद कळलाच नाही. त्यांचे त्या अर्थाने सोशलायझेशन झालेच नाही. नव्या पिढीला आजमितीस चळवळीची गरजच काय, याचीच जाणीव नसल्याने त्यांना व्यवस्था उभारणे, ती रूजवणे, टिकवणे त्याबद्दलची सुरक्षितता आदी बाबी न कळल्याने ही पिढी भरकटत चालली आहे, असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.चिंतामणी ट्रस्ट यांच्या सहयोगाने मुक्त शब्द मासिक आणि शब्द द बुक गॅलरीतर्फे आयोजित शब्दगप्पांच्या समारोपाच्या सत्रामध्ये प्रकाश आंबेडकर बोलत होते. रिपब्लिकन ऐक्याबद्दलच्या प्रश्नावर ते उत्तरले की, माणूस जर स्वतंत्र असेल तर तो स्वतंत्रपणे विचार करू शकतो. दुर्दैवाने, ८० नंतर राजकारणात आलेल्या पिढीचा आयक्यूच कमी होता, त्यांचा आत्मविश्वासही डळमळीतच होता. त्यामुळे त्यांचे नेतृत्व हे अवलंबित्वावर वाढलेले आहे. त्यांना स्वत:बद्दलच न्यूनगंड आहे आणि तो दुसऱ्यापर्यंत नेऊन ते पोहोचवत आहेत, असा टोलाही आंबेडकर यांनी नाव न घेता लगावला.आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, राजकीय पक्षांनी जनतेकरिता हे आरक्षण आणण्यापूर्वी स्वपक्षामध्ये त्याची किती आणि कशी अंमलबजावणी केली हे तपासायला हवे. माझ्यामध्ये स्वत:हून बदल घडविण्याच्या वृत्तीचा भाग आपल्या देशातच कुठे तरी हरवलेला आहे. काँग्रेसला निवडणुकांदरम्यान जो झटका बसला तसा जर का भाजपाला बसला तर ते स्वत:ला पुनर्प्रस्थापित करू शकतील का, हा प्रश्न आहे. आणि आज आरक्षण हे विकासाचे साधन झालेले आहे. चळवळीचा मूळ उद्देश हरवून तो राजकीय सत्ता यामध्ये परिवर्तित झाला तेव्हाच चळवळ संपायला सुरुवात झाल्याचे सांगत चळवळी चालवताना आपला आवाका, उद्दिष्ट यांचे स्पष्ट चित्र समोर असण्याच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला. चळवळ ही जेव्हा पक्षामध्ये बदलते त्या वेळी तिच्या उद्दिष्टांवरच गदा येते आणि सरसकटपणे चालणाऱ्या चळवळी या यशस्वी होत नसतात, असे स्पष्ट मतही या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी मांडले.दलित चळवळ विद्रोही झाली की तिच्यावर ‘नक्षली’ असा शिक्का मारला जातो. या पार्श्वभूमीवर कबीर कला मंच, सचिन माळी - शीतल साठे यांच्या ग्रुपला पाठिंबा देण्यामागची भूमिका काय आहे, असे विचारले असता ते म्हणाले, आदिवासी ज्या भागात राहतात त्या भागात खनिजांचे प्रमाण अधिक आहे. साहजिकच त्यांच्या जागेवर अतिक्रमण, त्यांचे विस्थापन या गोष्टी घडतात. आदिवासींना मदत करणाऱ्यांची भाषा विद्रोहाची, उठावाची आहे, याचे कारण त्यांना मदत करणाऱ्यांची धारणा आहे की, या लोकशाही व्यवस्थेत आदिवासींना योग्य न्याय मिळत नाही. मात्र, लोकशाही न मानणे म्हणजे राज्याच्या विरोधात बंड पुकारणे असा अर्थ होत नाही. व्यवस्था मान्य न झाल्यास उठाव करण्याचा, सत्ताबदल करण्याचा अधिकार लोकशाहीने सर्वांनाच दिला आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शक्तिसंगमाच्या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना आंबेडकर म्हणाले की, रा.स्व. संघाला शक्तिप्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. परंतु त्यामागे त्यांचा हेतू काय होता. सत्ता हा उद्देश की स्वत:ला जे ते सोशोकल्चरल संघटना म्हणवतात ते कारण आहे. ते जो सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणतात, त्याचीही मांडणी केल्याचे मला आढळलेले नाही. (प्रतिनिधी)