मुंबई : आज देशातील युवकांमध्ये अभिजात नृत्य, संगीत व वाद्यसंगीत शिक्षणाप्रती रुची वाढत आहे. या कलाशाखांमध्ये प्रावीण्य प्राप्त करण्याची जिद्द व निष्ठा त्यांच्यामध्ये दिसत आहे. ही गोष्ट अभिजात कलांच्या भवितव्यासाठी निश्चितच आश्वासक असल्याचे मत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले. विख्यात कथ्थक गुरू पंडित बिरजू महाराज यांना आदित्य विक्रम बिर्ला कला शिखर पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते शनिवारी देण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.संगीत कला केंद्राच्या वतीने दरवर्षी नामांकित कलाकारांना हा पुरस्कार देण्यात येतो. युवा कुचीपुडी कलाकार प्रतीक्षा काशी (बंगळुरू) व युवा पुरुष ओडिसी नर्तक राहुल आचार्य यांना ‘कला किरण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पूर्वी अभिजात संगीत व नृत्याला राजाश्रय मिळत असे. मंदिर आणि देवस्थानेही कलाकारांना सन्मान देत असत. आज अभिजात कला जोपासणाऱ्या गुरू-शिष्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी शासन, समाज आणि संगीत - कला क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. संगीत कला केंद्राच्या अध्यक्षा राजश्री बिर्ला, निवड समितीच्या प्रमुख कनक रेळे व केंद्राचे सचिव ललित डागा या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नव्या पिढीचे अभिजात कलेप्रती प्रेम आश्वासक
By admin | Published: November 24, 2014 1:20 AM