लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवारी सायंकाळी मुंबईत दाखल होत असून शनिवार, १८ फेब्रुवारी रोजी दुपारी राजभवनातील दरबार हॉल येथे समारंभपूर्वक राज्यपालपदाची शपथ घेणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती त्यांना पदाची शपथ देतील.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर झारखंडचे राज्यपाल असलेल्या रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. त्याबाबत राष्ट्रपतींनी गेल्या आठवड्यात नियुक्ती आदेश जारी केला होता. कोश्यारी यांनी तीन वर्षापेक्षा जास्त काळ राज्याचे राज्यपालपद सांभाळले. मात्र, राज्यातील राजकीय संघर्ष, त्यात त्यांनी घेतलेली भूमिका, वादग्रस्त वक्तव्ये यामुळे त्यांची कारकीर्द चर्चेत राहिली. आपल्या कार्यकाळात कोश्यारी यांनी राजभवन सर्वांसाठी खुले केले.