राणीबागेत येणार नवे पाहुणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 02:17 AM2019-01-25T02:17:25+5:302019-01-25T02:17:29+5:30
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात येत्या काही महिन्यांत आणखी काही प्राण्यांची भर पडणार आहे.
मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात येत्या काही महिन्यांत आणखी काही प्राण्यांची भर पडणार आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि बिहार या राज्यांतून येथे प्राणी आणले जाणार असून, यात काळा बदक, सिंह, वाघ, लांडगा, कोल्हा आणि बारशिंगा या प्राण्यांचा समावेश आहे.
येथे नवीन व सध्या असलेल्या प्राण्यांसाठी १७ पिंजरे बांधण्यात येणार आहेत. पिंजरे उभारण्यासाठी एका कंपनीला ७६.३४ कोटींचे कंत्राट देण्यात येत असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. विविध प्राण्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांसाठी प्रदर्शनीय गॅलरी तयार करण्यात येणार आहे. यामध्ये बिबट्याचा पिंजरा आणि लहान मांजरींसाठी संकुलात तारांपासून तयार केलेल्या दोरखंडाच्या जाळीचे कुंपण बसविण्यात येणार आहे. याशिवाय अॅक्रेलिक ग्लास, जीवन समर्थन प्रणाली आणि कृत्रिम दगडांचा समावेश आहे.
कोण आहेत नवीन पाहुणे
लांडगा, अस्वल, कोल्हा, कासव, पाणमांजर, तरस, बिबट्या, लहान मांजर, पक्षी आणि सरपटणारे प्राणी आदींकरिता पिंजºयांसाठी प्रदर्शनी निवासस्थाने बांधण्यात येणार आहेत.