Join us

Unlock guideline for Mumbai: मुंबईकरांसाठी नवी गाईडलाईन जारी! धार्मिक स्थळांमध्ये क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 7:47 PM

Corona Unlock guideline for Mumbai from 7 Octomber, 2021.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आला असल्याने राज्य सरकारने शाळा पाठोपाठ घटस्थापनेपासून मंदिर आणि धार्मिक स्थळे दर्शनासाठी उघडण्याचा निर्णय घेतला. मात्र ही परवानगी देताना कोविड प्रतिबंधक नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबईकोविडच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात मागील काही महिन्यांपासून बंद असलेल्या सर्व धार्मिक स्थळांचे द्वार अखेर गुरुवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर खुले होणार आहे. यासंदर्भात मुंबईसाठी महापालिका प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार मंदिर तसेच धार्मिक स्थळांच्या एकूण क्षमतेच्या केवळ ५० टक्के उपस्थिती ठेवता येणार आहे. तसेच निर्जंतुकीकरण, मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतर राखणे बंधनकारक असणार आहे. (Unlock guideline for Mumbai from 7 Octomber, 2021) 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आला असल्याने राज्य सरकारने शाळा पाठोपाठ घटस्थापनेपासून मंदिर आणि धार्मिक स्थळे दर्शनासाठी उघडण्याचा निर्णय घेतला. मात्र ही परवानगी देताना कोविड प्रतिबंधक नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रासाठी शुक्रवारी नियमावली जाहीर केली. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मुंबईत १५ ऑगस्टपासून कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या लोकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र सर्वांसाठी लोकल सेवा सुरु करण्याबाबत अद्याप कोणता निर्णय घेण्यात आलेला नाही. शाळा आणि धार्मिक स्थळ खुली होत असली तरी अन्य बाबींसाठी 'ब्रेक द चेन' मोहिमेअंतर्गत जुनेच नियम कायम राहणार असल्याचे, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी परिपत्रकातून स्पष्ट केले आहे. 

अशी आहे नियमावली.... 

* बाधित क्षेत्र नसलेल्या ठिकाणचीच धार्मिक स्थळे सुरु करण्याची परवानगी असेल. 

* तोंडाला मास्क लावलेला असावा, सहा फुटांचे सुरक्षित अंतर आणि निर्जंतुकीकरण बंधनकारक असेल. 

* कोविडची लक्षणे असलेल्या भाविकांनी मंदिरात जाऊ नये. मूर्ती किंवा धार्मिक प्रतिकाला हात न लावता दुरुनच दर्शन घ्यावे. तसेच गर्दी करु नये.

* सहव्याधी असणारे, गर्भवती महिला, दहा वर्षांखालील मुले यांनी शक्यतो धार्मिक स्थळे, मंदिरात जाणे टाळावे. 

* धार्मिक स्थळाच्या क्षमतेनुसार प्रवेश द्यावा, परिसरातील स्टॉल, दुकानांत सोशल डिस्टन्स पाळावा, तीर्थ प्रसाद वाटू नये.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस