मुंबईत नवा उच्चांक; शनिवारी दिवसभरात 1.61 लाख प्रवाशांचे उड्डाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 09:49 AM2023-11-21T09:49:21+5:302023-11-21T09:49:38+5:30
मुंबई विमानतळाचा नवा उच्चांक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या शनिवारी मुंबईविमानतळाने प्रवासी संख्येचा नवा उच्चांक प्रस्थापित केला. या दिवशी विमानतळावरून तब्बल १ लाख ६१ हजार ७६० प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे, मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
मुंबई विमानतळावरून देशातील अनेक विमानतळांशी थेट जोडणी वाढली आहे. त्यातच हिवाळी हंगामाकरिता नागरी विमान महासंचालनालयाने (डीजीसीए) देशातील विमान कंपन्यांना प्रत्येक आठवड्यासाठी वाढीव विमान फेऱ्यांची अनुमती दिली आहे. त्यानंतर विमान कंपन्यांनी अनेक मार्गांवरील फेऱ्या वाढवल्या आहेत. परिणामी, लोकांनी विमान प्रवासाला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे ११ नोव्हेंबर रोजी विक्रमी विमान फेऱ्यांचादेखील नवा विक्रम प्रस्थापित केला होता. ११ नोव्हेंबर रोजी एका दिवसात १ हजार ३२ विमानांच्या फेऱ्या झाल्या, तर ११ ते १३ नोव्हेंबर अशा दिवाळीच्या दोन दिवसांत मुंबई विमानतळावरून तब्बल ५ लाख १६ हजार ५६२ लोकांनी प्रवास केला. मुंबई विमानतळावरून या दोन दिवसांत एकूण २८९३ विमानांची वाहतूक झाली.
या विमानांच्या माध्यमातून ३ लाख ५४ हजार ५४१ लोकांनी देशांतर्गत प्रवास केला आहे. तर, १ लाख ६२ हजार २३१ प्रवासी परदेशात रवाना झाले. मुंबईतून परदेशात जाणाऱ्या प्रवाशांनी प्रामुख्याने दुबई, लंडन, अबुधावी, सिंगापूर आदी ठिकाणांना सर्वाधिक पसंती दिली आहे तर, देशांतर्गत मार्गांवर दिल्ली, बंगळुरू, चेन्नई आदी ठिकाणी सर्वाधिक प्रवासी मुंबईतून गेल्याचे दिसून आले.
मालवाहतुकीतही
दणदणीत वाढ
दिवाळीच्या काळात मुंबई विमानतळावरील मालवाहतुकीतही दणदणीत वाढ झाल्याची माहिती आहे. दिवाळीच्या दिवसात तब्बल ५६०० मेट्रिक टन इतक्या मालाची ने-आण विमानाद्वारे झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा तब्बल २५०० मेट्रिक टन जास्त वाढ आहे. यापैकी सर्वाधिक माल हा ई-कॉमर्स कंपन्यांचा होता. दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात लोकांनी ऑनलाइन पद्धतीने खरेदी केली. त्यामुळेही विमान कंपन्यांना मोठा व्यवसाय प्राप्त झाला आहे.