नवा उच्चांक: सेन्सेक्स प्रथमच ५८ हजारांवर बंद; निफ्टीनेही गाठले नवे शिखर, तेजीचा लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 08:34 AM2021-09-04T08:34:46+5:302021-09-04T08:35:09+5:30
सेन्सेक्समधील रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग ४ टक्क्यांनी वाढले.
मुंबई : भारतीय शेअर बाजारांनी शुक्रवारी नवा उच्चांक केला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आपल्या इतिहासात प्रथमच ५८ हजार अंकांच्यावर बंद झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १७,३०० अंकांच्यावर गेला. ३० कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स २७७.४१ अंकांनी वाढून ५८,१२९.९५ अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे ८९.४५ अंकांच्या वाढीसह निफ्टी १७,३२३.६० अंकांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांचा हा सार्वकालिक उच्चांक ठरला आहे.
सेन्सेक्समधील रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग ४ टक्क्यांनी वाढले. टायटन, टाटा स्टील, बजाज ऑटो, मारुती आणि डॉ. रेड्डीज यांचे समभाग वाढले. याउलट एचयूएल, भारती एअरटेल, एचडीएफसी द्वयी आणि इंडसइंड बँक यांचे समभाग घसरले. दरम्यान, धातू आणि वाहन क्षेत्रातील समभागांत जोरदार खरेदी झाल्याचा लाभ बाजारांस झाला, असे बाजारातील सूत्रांनी सांगितले. भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाले होते. सेन्सेक्स ५१४.३३ अंकांनी, तर निफ्टी १५७.९० अंकांनी वाढला होता.
युरोपात तेजीचे वारे
आशियाई बाजारांपैकी शांघाय आणि हाँगकाँग येथील बाजार घसरले. सेऊल आणि टोकियो येथील बाजार मात्र वाढले. युरोपात तेजीचे वारे दिसून आले. अमेरिकेतील एस अँड पी ५०० आणि नॅसडॅक हे निर्देशांक काल तेजीसह बंद झाले होते. तीन दिवसांच्या दबावानंतर डाऊमध्येही १३१ अंकांची तेजी पाहायला मिळाली होती.