नव्या घरात दिवाळीसाठी प. उपनगरांना पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 02:19 PM2023-10-08T14:19:27+5:302023-10-08T14:19:44+5:30
आगामी काही दिवसांत दसरा व दिवाळी हे सण आहेत. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक बिल्डर आकर्षक योजना सादर करतील. याचा थेट परिणाम गृहविक्री वाढण्याच्या रूपाने दिसून येईल.
मुंबई : चालू वर्षात मुंबईसह महामुंबईत गृहविक्रीने चांगलाच जोर पकडल्याचे दिसून येत आहे. गेल्या सलग तीन महिन्यांत मुंबईतल्या गृहविक्रीने १० हजारांचा टप्पादेखील ओलांडला आहे. त्यातच शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने सादर केलेल्या पतधोरणाच्या माध्यमातून चौथ्यांदा व्याजदर स्थिर ठेवले आहेत. आगामी काही दिवसांत दसरा व दिवाळी हे सण आहेत. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक बिल्डर आकर्षक योजना सादर करतील. याचा थेट परिणाम गृहविक्री वाढण्याच्या रूपाने दिसून येईल.
सर्वाधिक मागणी पश्चिम उपनगरात
मुंबईत विकासकामे सुरू आहेत त्यातील मेट्रोच्या महत्त्वाच्या टप्प्यांचे काम मुंबईच्या पश्चिम उपनगरात पूर्ण झाले आहे. ज्या लोकांची कार्यालये पश्चिम उपनगरांत आहेत किंवा ज्यांना कार्यालयापर्यंत जाण्यासाठी मेट्रोचा उपयोग होत आहे, अशा लोकांनी आता त्याच परिसरात घरे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. चालू वर्षात मुंबईत ३१ टक्के घरांची विक्री ही पश्चिम उपनगरात झाल्याचे दिसून येते, तर पूर्व उपनगरातही आता विकासकामे सुरू असल्याने घरांच्या मागणीतही वाढ होताना दिसत आहे.
२, ३ बीएचकेला सर्वाधिक मागणी
- गेल्या दोन वर्षांपासून घर खरेदी करण्यास इच्छुक ग्राहकांचा कल बदलताना दिसत असून २ बेडरूम, हॉल, किचन, ३ बेडरूम, हॉल, किचन यांची खरेदी करण्याचा ट्रेंड दिसून येत आहे.
- ज्यांचे सध्या १ रूम किचन अथवा त्यापेक्षा कमी आकाराचे घर आहे, अशा लोकांचा कलदेखील मोठ्या घरांची खरेदी करण्याकडे असल्याचे दिसून येते.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नव्या घराचे बुकिंग
भारतीय रिझर्व्ह बँकेने मे २०२२ पासून सादर केलेल्या सलग पाच पतधोरणात व्याजदरात वाढ करत ते अडीच टक्क्यांनी वाढवले. या व्याजदरवाढीचा फटका गृहविक्रीला बसेल असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, लोकांच्या क्रयशक्तीमध्ये वाढ होत असून बाजारानेदेखील व्याजदरवाढीचा शॉक आता पचवला आहे. आगामी काही दिवसांत असलेल्या दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व परिसरातील विकासक नव्या प्रकल्पांची घोषणा करतील, तसेच विद्यमान प्रकल्पातदेखील काही सूट योजना जारी करू शकतात. त्यामुळे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अनेकांना नव्या घराचे बुकिंग करता येईल किंवा जी घरे तयार आहेत त्या घरात राहायला जाता येईल.