नव्या गृहमंत्र्यांनी संघनिष्ठ शोधण्याऐवजी वाझे शोधावेत; भाजपचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:07 AM2021-04-08T04:07:29+5:302021-04-08T04:07:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : खात्याचा कारभार स्वीकारताच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी संघनिष्ठ अधिकारी शोधणार असल्याचे जाहीर केले. संघाची ...

The new Home Minister should look for Waze instead of looking for Sangh; BJP's Tola | नव्या गृहमंत्र्यांनी संघनिष्ठ शोधण्याऐवजी वाझे शोधावेत; भाजपचा टोला

नव्या गृहमंत्र्यांनी संघनिष्ठ शोधण्याऐवजी वाझे शोधावेत; भाजपचा टोला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : खात्याचा कारभार स्वीकारताच गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी संघनिष्ठ अधिकारी शोधणार असल्याचे जाहीर केले. संघाची शिकवण देशप्रेमाची आहे. त्यामुळे संघनिष्ठ अधिकारी शोधण्यात वेळ घालविण्यापेक्षा खात्यात भ्रष्ट व्यवहार करणारे जे ‘वाझे’ दडलेले आहेत, त्यांना शोधून काढावे, ते महाराष्ट्राच्या हिताचे आहे, असा टोला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी लगावला.

भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारने लाॅकडाऊन लावत जनतेची घोर फसवणूक केल्याचा आरोप केला. रोज बदलणारे नियम, मंत्र्यांची परस्परविरोधी विधाने पाहता राज्य सरकारची परिस्थिती ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं’ अशी झाली आहे. केवळ शनिवार आणि रविवारी पूर्ण लाॅकडाऊन करणार असल्याचे सांगत सरकारने विरोधी पक्षांसह जनतेचीही फसवणूक केल्याचे दिसून आले. पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात बाजारपेठा, दुकाने बंद केल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. महाविकास आघाडी सरकारला कठोर निर्बंध लावायचे आहेत की लॉकडाऊन? असा सवाल उपाध्ये यांनी केला.

राज्यावरील कोरोना संकट टाळण्यासाठी भाजप जबाबदार विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. मात्र, सरकारने सामान्य, गोरगरीब, कष्टकरी वर्गाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने या वर्गाला आर्थिक मदत द्यायला हवी होती. पण, लाॅकडाऊनचे नियम जाहीर करून मुख्यमंत्री ‘मातोश्री’त बसले आहेत. या संकटकाळात जनतेचे काय, हा साधा प्रश्नही त्यांना पडत नसावा काय? सरकार एवढे निर्दयी कसे असू शकते? असा प्रश्नही उपाध्ये यांनी केला. राज्यातील अर्थचक्र गतिमान करण्याच्या गप्पा मारणाऱ्या या वसुली सरकारने अप्रत्यक्ष लॉकडाऊन लावून अर्थव्यवस्थेचे चक्र पूर्णत: ठप्प केले. या कठीण काळात सरकारने वीज बिलांची वसुली थांबवण्याचा निर्णय घेणे अपेक्षित होते; मात्र त्यांनी त्याकडेही दुर्लक्ष केले. केवळ जनतेची पिळवणूक हेच या सरकारचे धोरण आता स्पष्ट झाल्याचे उपाध्ये म्हणाले.

.....................

Web Title: The new Home Minister should look for Waze instead of looking for Sangh; BJP's Tola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.