साडेनऊ तासांत धरमतर ते गेटवे

By admin | Published: March 15, 2016 12:44 AM2016-03-15T00:44:50+5:302016-03-15T00:44:50+5:30

मध्यरात्रीचा शांत समुद्र, भरती-ओहोटीमधील मध्यकाळात तिने समुद्रात सूर मारला. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सागराला आव्हान देत, १० वर्षीय डॉली पाटीलने धरमतर

In the new hours, the gateway to the street | साडेनऊ तासांत धरमतर ते गेटवे

साडेनऊ तासांत धरमतर ते गेटवे

Next

- महेश चेमटे,  मुंबई
मध्यरात्रीचा शांत समुद्र, भरती-ओहोटीमधील मध्यकाळात तिने समुद्रात सूर मारला. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सागराला आव्हान देत, १० वर्षीय डॉली पाटीलने धरमतर ते गेटवे अंतर ९ तास २९ मिनिटे २३ सेकंदांत झुंजारपणे पार केले.
उरण धरमतर जेट्टी ते गेटवे आॅफ इंडिया हे सागरी ४० किलोमीटर अंतर पार करण्याचा निर्धार भिवंडीच्या डॉली पाटीलने केला होता. अडथळ्यांना बाजूला सारत डॉलीने अथक परिश्रमाने आपले लक्ष्य पार केले. धरमतर बंदरावरून डॉलीने रविवारी मध्यरात्री ३:१६ मिनिटांनी समुद्रात उडी घेतली. तत्पूर्वी जेट्टी बंदराजवळील गोपाळ म्हात्रे कुटुंबीयांनी डॉलीच्या धाडसाचे कौतुक करत, तिच्या राहण्याची मोफत व्यवस्था केली.
समुद्रातील वाढत्या प्रदूषणाचा फटका डॉलीलादेखील बसला. ५ ते ६ किमी अंतर पार केल्यानंतर डॉलीच्या स्वीमिंग गॉगल्सवर शेवाळ चिकटले, पण तिने शेवाळ साफ करत आपली मोहीम सुरू ठेवली. या अडथळ्याचा काहीसा परिणाम तिच्या वेगावरही झाला. या मोहिमेचे निरीक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सागरी क्रीडा विभागाचे निरीक्षकदेखील दोन टाइमवॉच घेऊन उपस्थित होते.
पहाटेच्या वेळी रेवस बंदराच्या आधी १२ किमीवर मासे पकडण्याच्या जाळ्यात डॉलीचा पाय अडकला, पण मनात असलेल्या प्रचंड इच्छाशक्तीमुळे ते जाळे तिने सहज सोडवले. सूर्योदयानंतर ताशी ६ ते ७ किमी या वेगाने तिने अंतर पार केले, परंतु गेटवेपासून ३ किमी दूर असताना, तिला अडचणींचा सामना करावा लागला. गेटवेवरील जहाजांच्या हालचालींमुळे समुद्रात लाटा निर्माण झाल्या. त्यामुळे डॉली १ ते २ किमी मागे फेकली गेली. अखेर प्रयत्नांची शर्थ करत, दुपारी १२ वाजून ४५ मिनिटे आणि २३ सेकंदात हे अंतर पूर्ण केले.


मध्यरात्री समुद्र शांत असतो. त्यामुळे मी मध्यरात्रीची वेळ निवडली. तत्पूर्वी, प्रशिक्षक विलास माने आणि अर्जुन पुरस्कार विजेते संतोष पाटील यांचा सल्ला घेतला. सुरुवातीला थोडा त्रास झाला, पण अखेर मी सागरी मोहीम पूर्ण करू शकले, याचा आनंद आहे. आता पुढील लक्ष्य इंग्लिश खाडी पार करण्याचे आहे. त्या दृष्टीने मी तयारी करणार आहे.
- डॉली पाटील

Web Title: In the new hours, the gateway to the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.