परदेशी प्राण्यांसाठी राणीच्या बागेलगत नवी ' घर बांधणी'
By जयंत होवाळ | Published: February 13, 2024 09:07 PM2024-02-13T21:07:37+5:302024-02-13T21:07:52+5:30
महापालिकेकडून निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात आगामी काळात नवे प्राणी येण्यास अजून अवकाश असला तरी, या प्राण्यांसाठी मफतलाल मिलकडून घेण्यात आलेल्या १० एकर भूखंडांवर पिंजरे उभारण्यासाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
मफतलाल मिलचा भूखंड राणी बागेलगत आहे. हा दहा एकराचा भूखंड पालिकेने विकत घेतला असून त्यावर विस्तार केला जाणार आहे. या ठिकाणी परदेशी प्राण्यांचा अधिवास तयार केला जाणार आहे. काळा जग्वार, चित्ता, पांढरा सिंह, वॉलाबी, चिंपांझी, झेब्रा, जिराफ, रिंग टेल लेमर, मँडरिल माकड, लेसर फ्लेमिंगो, हिप्पो आणि इमू यासारखे परदेशी प्राणी बागेत आणले जाणार आहेत. या प्राण्यांच्या पिंजर्यांसाठी दोन वर्षांपूर्वी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपने केल्यानंतर निविदा रद्द करण्यात आल्या होत्या. दरम्यानच्या काळात परदेशातून प्राणी आणण्यासाठी पालिकेने पुन्हा प्रयत्न सुरु केले आहेत. प्राण्यांच्या पिंजर्यांसाठी लवकरच निविदा मागवण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात दिली आहे.
नवीन निविदा येत्या एक किंवा दोन महिन्यांत निघण्याची शक्यता आहे. निविदा काढण्यापूर्वी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कामाचा अनुभव असलेली एखादी संस्था सल्लागार असू शकेल. सल्लागार पिंजर्यांची सुविधा आणि तपशीलवार आराखडा पालिकेला सादर करेल त्यानंतर पुढील कार्यवाही होईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. बागेच्या विस्ताराला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.
सुमारे १२ एकर क्षेत्रामध्ये पिंजर्यासाठी प्राथमिक योजना तयार करण्यात आली होती. मात्र त्यापैकी दोन एकर जमीन घेता आली नाही. त्यामुळे योजनेत काही बदल करावा लागला आहे. यावेळीही निविदा खर्चाचा अंदाज जास्त असण्याची शक्यता आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. पिंजरे आणि प्राण्यांसाठी अधिवास तयार करण्यासाठी आयात सामग्री वापरावी लागेल. काही विशिष्ट संकल्पनेवर आधारित हे पिंजरे असतील. प्राणी आफ्रिकन खंडातील असतील तर, पिंजर्यांच्या सभोवतालचा परिसर महाद्वीपासारखा असेल.