कांजूरमार्गला तोडक कारवाई केलेल्या जागी उभारली नवी घरे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 04:47 AM2018-10-24T04:47:48+5:302018-10-24T04:48:07+5:30
कांजूर रेल्वे स्थानक परिसरात फलाटाच्या विस्तारीकरणादरम्यान अडथळा ठरणाऱ्या १० झोपड्यांवर प्रशासनाने तोडक कारवाई केली.
मुंबई : कांजूर रेल्वे स्थानक परिसरात फलाटाच्या विस्तारीकरणादरम्यान अडथळा ठरणाऱ्या १० झोपड्यांवर प्रशासनाने तोडक कारवाई केली. तेथील रहिवाशांचे पुनर्वसन केले. मात्र, वर्षभराने या ठिकाणी नवी घरे उभी राहिली आणि तब्बल १५ ते १७ लाखांत त्यांची विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत आहे.
कांजूर रेल्वे स्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरणादरम्यान २००७ मध्ये येथील १० झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांचे वाशी नाका परिसरात स्थलांतर केले गेले. रेल्वेकडून या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात आली. तरीही तोडक कारवाई केलेल्या जागेवर नव्याने १० घरे उभी राहिली. १५ ते १७ लाखांत यातील ३ घरांची विक्री झाली, तर उर्वरित घरांची १७ लाखांना विक्री सुरू आहे. या अनधिकृत घरांना अवैध पद्धतीने वीज, पाणीपुरवठाही करण्यात येत आहे.
गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराकडे प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. एखादी व्यक्ती तक्रारीसाठी पुढे येताच, स्थानिक भूमाफिया महिलेकडून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली जाते, तसेच यामध्ये रेल्वेच्या एका कंत्राटी अधिकाºयाला हाताशी धरून हा कारभार सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. अधिकारी बदलत असल्याने, नवीन अधिकारी या कारवाईबाबत अनभिज्ञ आहेत.
>शहानिशा करून कारवाई करू
कांजूरमार्ग स्थानकातील रेल्वे हद्दीत अनधिकृत झोपडपट्टी असल्यास त्याबाबत तपासणी करण्यात येईल. तपासणीअंती नियमबाह्य किंवा काही गैर आढळल्यास योग्य ती कारवाई तातडीने करण्यात येईल.
- ए. के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.