मुंबई : नाट्य परिषदेतील कथित गोंधळ मागच्या पानावरून पुढे सुरू असतानाच, शनिवार, २७ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेली नियामक मंडळाची बैठक रद्द केली गेल्याने नाट्य परिषदेत धुळवडीचा नवा अंक रंगला आहे.
नियामक मंडळ सदस्यांच्या म्हणण्यानुसार, शरद पोंक्षे यांनी प्रमुख कार्यवाह या नात्याने २७ मार्च रोजी नियामक मंडळाच्या सदस्यांची बैठक आयोजित केली होती. मात्र, आता कोरोनाचे कारण देत सदर बैठक त्यांनी रद्द केली, अशी माहिती नियामक मंडळ सदस्य वीणा लोकूर यांनी दिली आहे. १८ फेब्रुवारी रोजी नियामक मंडळ सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत प्रसाद कांबळी यांना बहुमत सिद्ध करायचे होते. त्यात ते असमर्थ ठरले. २७ मार्च रोजी आयोजित केलेल्या बैठकीत, वेगवेगळ्या विभागांचे नेतृत्व करणारे नियामक मंडळ सदस्य त्यांचे विचार मांडण्यासाठी उत्सुक होते.
मात्र, कोरोनाचे कारण देत ही बैठकच रद्द करण्यात आली. बाकीचे सगळे व्यवहार नियम पाळून व्यवस्थितपणे चालू असतानाच, अशी महत्त्वाची बैठक प्रतिबंधात्मक नियम पाळून यशवंत नाट्यमंदिरात घेणे सहजशक्य होते. पण, केवळ काहीतरी कारण दाखवून आणि पळवाटा शोधून ही बैठक रद्द केल्याचे दिसत आहे. हा निव्वळ पळपुटेपणा आहे आणि त्याचा आम्ही निषेध करीत आहोत, अशी भूमिका वीणा लोकूर यांनी घेतली आहे. त्यांना पाठिंबा देताना विजय गोखले, सविता मालपेकर, विजय कदम आदी नियामक मंडळ सदस्यांनीही याबाबत निषेध नोंदवला आहे.
त्याचबरोबर, सध्या नाट्य परिषदेचा अध्यक्ष नक्की कोण, याबाबतचा संभ्रमही अद्याप कायम आहे. नरेश गडेकर व प्रसाद कांबळी हे दोघेही अध्यक्षपदावर दावा करताना दिसत आहेत. प्रसाद कांबळी हेच नाट्य परिषदेचे अध्यक्ष असून त्यांची कार्यकारिणी कार्यरत आहे आणि कार्यालयीन कामकाज व्यवस्थित सुरू आहे, असा दावा प्रवक्ते या नात्याने मंगेश कदम यांनी केला आहे. तर, १८ फेब्रुवारीच्या सभेत नियामक मंडळ सदस्यांनी बहुमताने नरेश गडेकर यांची पुढील कार्यकाळासाठी अध्यक्ष म्हणून निवड केली असल्याने सध्या तेच नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत, अशी भूमिका नियामक मंडळ सदस्यांनी घेतली आहे.
दुसरीकडे, सहकार्यवाह सतीश लोटके यांनी, मंगेश कदम यांच्या ‘प्रवक्ता’ असण्यालाच हरकत घेतली आहे. त्याचप्रमाणे, नियामक मंडळाने सभेची मागणी केली असतानाही सभा न घेणारे शरद पोंक्षे आणि सभा होऊ नये म्हणून कोर्टात जाणारे व बहुमत नसतानाही खुर्चीला चिकटून बसणारे प्रसाद कांबळी यांचा निषेध करीत असल्याचेही सतीश लोटके यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नाट्य परिषदेच्या संदर्भात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दाव्याची सुनावणी २६ मार्च रोजी होणार होती. परंतु, आता ती २२ जून रोजी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, नाट्य परिषदेतील कारभाराबद्दल धर्मादाय आयुक्तांकडे केल्या गेलेल्या याचिकेची सुनावणीही अद्याप व्हायची असल्याचे समजते.