फेरीवाला क्षेत्राची नवीन यादीही वादात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 03:41 AM2018-01-19T03:41:45+5:302018-01-19T03:41:57+5:30
तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहर नियोजन समिती स्थापन झाली. मात्र फेरीवाल्यांच्या यादीवरून पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. पालिकेने जाहीर केलेल्या यादीत राजकीय पक्षाच्या नेत्यांसह
मुंबई: तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहर नियोजन समिती स्थापन झाली. मात्र फेरीवाल्यांच्या यादीवरून पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले आहे. पालिकेने जाहीर केलेल्या यादीत राजकीय पक्षाच्या नेत्यांसह अनेक सेलिब्रिटींच्या घरासमोर फेरीवाला झोन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले असून याचे पडसाद पालिका महासभेत आज उमटले. त्यानुसार ही वादग्रस्त यादीच रद्द करण्याचे निर्देश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी प्रशासनाला आज दिले.
फेरीवाल्यांसाठी मुंबईत ८५ हजार ८९१ जागा पालिकेने निश्चित करुन त्यांची यादी संकेतस्थळावर सूचना, हरकतीसाठी जाहीर केली आहे. पालिका उपायुक्त निधी चौधरी यांनी ही यादी टिष्ट्वटरवरुन जाहिर केली.
मात्र नगरसेवकांना विचारात न घेता ही यादी तयार करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे ही प्रस्तावित यादी रद्द करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी सभागृहात आज केली.
नवीन यादी बनवताना महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, गटनेते यांना सहभागी करा, अशी जोरदार मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभागृहात लावून धरली. वॉर्डात नगरसेवक निधीतून नगरसेवक पदपथ तयार करतात. मात्र त्यावर फेरीवाल्यांना बसविताना त्याची नगरसेवकांनाच माहिती देण्यात येत नाही. या विभागाच्या प्रमुख निधी चौधरी यांना परत पाठवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. महापौर महाडेश्वर यांनीही तसे निर्देश प्रशासनाला दिले.