Join us

चित्रीकरणाचे नवे स्थळ ‘पश्चिम रेल्वे’

By admin | Published: June 27, 2017 3:42 AM

चित्रपट, जाहिरात आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी ‘पश्चिम रेल्वे’ नवे स्थळ म्हणून ओळखले जात आहे. २०१६-१७ मध्ये छायाचित्रीकरणातून पश्चिम रेल्वेने

महेश चेमटे। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चित्रपट, जाहिरात आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी ‘पश्चिम रेल्वे’ नवे स्थळ म्हणून ओळखले जात आहे. २०१६-१७ मध्ये छायाचित्रीकरणातून पश्चिम रेल्वेने तब्बल १ कोटी १२ लाखांहून अधिक कमाई केली आहे. विशेष म्हणजे, २०१५ सालच्या कमाईपेक्षा ही कमाई तब्बल सात पट अधिक आहे. २०१५-१६ मध्ये केवळ १४ लाख रुपये चित्रीकरणातून मिळवले होते. दिग्दर्शकांसह, जाहिरातदारांना आकर्षित करण्यास परेने ‘एक खिडकी योजना’सारखे उपक्रम राबवले होते. त्यामुळेच पश्चिम रेल्वेने कोट्यवधींची कमाई केली.पश्चिम रेल्वेवर चित्रीकरणासाठी सर्वाधिक पसंती गोरेगाव रेल्वे स्थानकाला मिळाली आहे. गतवर्षी गोरेगाव रेल्वे स्थानक चित्रपट, जाहिरातीसाठी तब्बल ११ वेळा चित्रीकरण करण्यात आले आहे, तर मुंबई सेंट्रल स्थानक दुसऱ्या नंबरवर असून, या स्थानकावर ७ वेळा चित्रीकरण झाले आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकांसह चर्चगेट कार्यालयाही चित्रपट आणि जाहिरातींचे शूटिंगसाठी आवडीचे ठिकाण बनत आहे. त्याचबरोबर, विरार, कांदिवली कारशेड, जोगेश्वरी यार्ड, लोअर परेल वर्कशॉप ही ठिकाणेदेखील चित्रीकरणाची नवी स्थळे म्हणून आपली ओळख बनवित आहेत.चित्रपट दिग्दर्शकांना आणि जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी पश्चिम रेल्वेने ‘एक खिडकी योजना’सारखे उपक्रम राबविले जात आहेत. परिणामी, दिग्दर्शकांसह, जाहिरातदारांनीदेखील याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. परिणामी, २०१५-१६ मध्ये १४ लाख ९८ हजार २०९ रुपये कमाई केलेल्या पश्चिम रेल्वेने २०१६-१७ मध्ये १ कोटी १२ लाख १३ हजार १८० रुपयांची कमाई केली आहे. शिवाय, कमी वेळात चित्रीकरणासाठी परवानगी मिळत असल्याने, पश्चिम रेल्वे चित्रीकरणाचे नवे स्थळ म्हणून उदयास येत आहे. चित्रपट आणि मालिकांमध्ये वास्तविकतेचा ‘टच’ देण्यासाठी फिल्मसिटीपेक्षा दिग्दर्शक प्रत्यक्ष स्थळावर जाऊन शूटिंग करणे पसंत करत आहेत. यात सेट बनविण्याचा खर्च, कर्मचाऱ्यांची मजुरी या गोष्टीवर खर्चात कपात होते. शिवाय फिल्मसिटीमध्ये शूटिंग करण्यापेक्षा प्रत्यक्ष स्थळावरील केलेले चित्रीकरण प्रेक्षकांना जास्त अपील करणारे असते, असे मत दिग्दर्शकाने व्यक्त केले आहे.