लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काही महिन्यांपूर्वी दादर येथील सिग्नल यंत्रणेत स्त्री-पुरुष समानतेचा प्रयोग महापालिकेने केला होता. त्यानंतर आता वरळी सी फेस येथील सिग्नल यंत्रणेला युनिडायरेक्टरल ट्रॅफिक लाइटचा नवा लूक देण्यात आला आहे. पालिकेच्या जी दक्षिण विभाग कार्यालयातील रस्ते व इलेक्ट्रिक विभागाच्या अभियंत्यांनी ही यंत्रणा विकसित केली आहे. वरळीबरोबर हाजी अली, प्रिन्सेस स्ट्रीट तसेच इतर भागात असे युनिडायरेक्टरल ट्रॅफिक लाइट तयार केले जाणार आहेत. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ही संकल्पना मांडली होती. त्यानुसार वाहतूक विभाग आणि खासगी संस्थेच्या मदतीने वरळी सी फेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर १ जानेवारीपासून युनिडायरेक्टरल ट्रॅफिक लाइट बसवण्यात आली आहे. सिग्नल यंत्रणेला युनिडायरेक्टरल ट्रॅफिक लाइटमध्ये रूपांतरित करण्यासाठी पालिकेच्या अभियंत्यांनी अथक परिश्रम घेतले. यात एलएडी लाइटचा वापर केला जाणार आहे.
मुंबईची वाहतूक सुरक्षा तसेच सौंदर्यात त्यामुळे भर पडली आहे. प्रायोगिक तत्त्वावरील ही योजना यशस्वी झाली तर संपूर्ण मुंबईत अशा प्रकारची सिग्नल यंत्रणा सुरू केली जाईल. जी दक्षिण विभागाचे पालिका सहायक आयुक्त शरद उघडे यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.
n युनिडायरेक्टरल ट्रॅफिक लाइटमुळे दोन्ही दिशांनी येणाऱ्या वाहनचालकांना लांबूनही सिग्नल दिसू लागेल. त्याचा अंदाज आल्यामुळे वाहनांचा वेग आधीच कमी करणे शक्य होईल.n पादचाऱ्यांनाही सिग्नल लांबून दिसल्यामुुुळे रस्ता ओलांडणे सोपे होईल. तसेच रात्रीच्या वेळी ही यंत्रणा अधिक ठळकपणे दिसल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे. n ऊन, पाऊस, सोसाट्याचा वारा यांच्या माऱ्यातही नवीन युनिडायरेक्टरल ट्रॅफिक खांब टिकून राहणार आहेत.