नवीन मराठी नाटकांचे सप्तक, मराठी रंगभूमीवर येणार विविध विषयांवरील नाटके

By संजय घावरे | Published: October 25, 2023 08:29 PM2023-10-25T20:29:45+5:302023-10-25T20:29:56+5:30

सर्व नाटके वेगवेगळ्या विषयांवर आधारलेली असून, त्यांना विनोदाची किनार जोडण्यात आली आहे.

new Marathi dramas, plays on various topics coming to Marathi theatre | नवीन मराठी नाटकांचे सप्तक, मराठी रंगभूमीवर येणार विविध विषयांवरील नाटके

नवीन मराठी नाटकांचे सप्तक, मराठी रंगभूमीवर येणार विविध विषयांवरील नाटके

मुंबई - यंदा गणेशोत्सवात रंगभूमीवर एकही नवीन नाटकनाटक न आणणाऱ्या नाट्यसृष्टीने दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल सात नवीन नाटकांची घोषणा केली आहे. हि सर्व नाटके वेगवेगळ्या विषयांवर आधारलेली असून, त्यांना विनोदाची किनार जोडण्यात आली आहे.

अलिकडच्या काळात रंगभूमीवर आलेल्या 'किरकोळ नवरे', 'डाएट लग्न', 'जर तरची गोष्ट', 'ओके हाय एकदम', 'अवघा रंग एकचि झाला', 'ब्रँड अॅम्बेसेडर' आदी नवीन नाटकांनंतर आणखी सात नवी कोरी नाटके रसिकांच्या सेवेत रुजू होणार आहेत. यात 'गालिब', 'मी बाई अॅडमिन', 'मर्डरवाले कुलकर्णी', '२१७ पद्मिनी धाम', 'आपण यांना पाहिलंत का?', 'राजू बन गया झेंटलमन' आणि 'मॅड सखाराम' या नाटकांचा समावेश आहे. यामध्ये विनोदी अंगाने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या नाटके जास्त आहेत, पण '२१७ पद्मिनी धाम' या सायकोलॉजिकल थ्रीलर नाटकासोबतच चिन्मय मांडलेकर लिखित-दिग्दर्शित 'गालिब' या नातेसंबंधांवर आधारलेल्या कौटुंबिक नाटकाचीही उत्सुकता आहे. 'गालिब'बाबत चिन्मय म्हणाला की. हे ओरिजनल आणि फ्रेश नाटक आहे. कोणत्याही पुस्तकावर किंवा कलाकृतीवर आधारलेले नाही. विशेषत: जे स्वत: क्रिएटिव्ह क्षेत्रात आहेत किंवा ज्यांच्या घरी या क्षेत्रातील व्यक्ती आहे त्यांच्यासाठी हे नाटक महत्त्वाचे असल्याचेही चिन्मय म्हणाला. 'राजू बन गया झेंटलमन' फुल्ल टू विनोदी नाटक अनोख्या शीर्षकामुळे लक्ष वेधून घेत आहे. संगीत दिग्दर्शनाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या संकेत पाटीलचे '२१७ पद्मिनी धाम' हे नाटक रत्नाकर मतकरींच्या 'कामगिरी' या कथेवर आधारीत असल्याने कुतूहल आहे. 'मी बाई अॅडमिन' हे विनोदी नाटक निर्मिती सावंत यांच्यामुळे प्रकाशझोतात आहे. 'मर्डरवाले कुलकर्णी' या नाटकाचे शीर्षकही उत्कंठावर्धक आहे. हे नाटक २४ नोव्हेंबर रोजी रंगभूमीवर येणार आहे असल्याचे अष्टविनायकचे निर्माते दिलीप जाधव यांनी सांगितले आहे. सध्या 'गालिब' आणि 'मी बाई अॅडमिन'वर त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचेही जाधव म्हणाले. '२१७ पद्मिनी धाम' या नाटकात आजवर कधीही न केलेली गिमिक्स करण्यात आल्याचे संकेत पाटीलचे म्हणणे आहे. या नाटकाद्वारे अमृता पवार व्यावसायिक रंगभूमीवर दाखल होणार आहे. 

- मंगेश सातपुते (दिग्दर्शक, मॅड सखाराम)

विजय तेंडुलकरांनी लिहिलेल्या 'सखाराम बाईंडर' या नाटकाचे पु. ल. देशपांडेंनी केलेले विडंबन म्हणजे 'मॅड सखाराम' हे नाटक आहे. संस्कृतीरक्षकांनी जेव्हा 'सखाराम बाईंडर'ला खूप विरोध केला, तेव्हा पुलंनी 'मॅड सखाराम' नाटकाच्या रूपात प्रतिक्रिया लिहिली होती. हे प्रायोगिक नाटक आजवर कोणी केलेले नाही. ते आम्ही करतोय. हे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात येईल.

- राजेश कोळंबकर (लेखक - राजू बन गया झेंटलमन)

'राजू बन गया झेंटलमन' हे कौटुंबिक रहस्यमय विनोदी नाटक आहे. यात राजूच्या भूमिकेत अंशुमन विचारे आहे. 'झेंटलमन' ही शीर्षकात गंमत करण्यात आली आहे. प्रशांत विचारेंनी दिग्दर्शन केलेले हे नाटक पूर्ण फॅमिलीसोबत एन्जॅाय करता येण्याजोगे आहे. रंगनीलच्या कल्पना कोठारी यांची निर्मिती असलेल्या या नाटकात उमेश जगताप आणि विनम्र भाबल यांचीही धमाल आहे. 

 

Web Title: new Marathi dramas, plays on various topics coming to Marathi theatre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.