नवीन महापौर बंगला शिवाजी पार्कातच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 01:58 AM2019-03-08T01:58:14+5:302019-03-08T01:58:22+5:30
दादर पश्चिम येथील शिवाजी पार्कवरील महापालिका अधिकाऱ्यांच्या जिमखान्याच्या जागेवर महापौर बंगला बांधण्यास विरोध होत आहे.
मुंबई : दादर पश्चिम येथील शिवाजी पार्कवरील महापालिका अधिकाऱ्यांच्या जिमखान्याच्या जागेवर महापौर बंगला बांधण्यास विरोध होत आहे. मात्र अधिकाऱ्यांसाठी महालक्ष्मी येथे नवीन सुसज्ज जिमखाना बांधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिका महासभेत गुरूवारी एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे मनसेच्या विरोधानंतरही शिवाजी पार्कवरच महापौरांसाठी बंगला बांधण्याचे मनसुबे शिवसेनेने स्पष्ट केले आहेत.
शिवाजी पार्कसमोरील महापौरांचा ऐतिहासिक बंगला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आला आहे. यामुळे मुंबईचे विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निवासाची व्यवस्था सध्या वीरमाता जीजाबाई भोसले उद्यानातील पालिकेच्या बंगल्यात करण्यात आली आहे. मात्र मुंबईचे महापौर हे प्रतिष्ठेचे पद असल्याने मध्यवर्ती ठिकाणीच त्यांचे निवासस्थान असावे, अशी मागणी होत होती. त्यामुळे शिवाजी पार्कवरील पालिकेच्या जिमखान्याच्या जागेची निवड यासाठी करण्यात आली. मात्र मनसेने या ठिकाणी बंगला बांधण्यास पालिकेला विरोध केला.
तसेच महालक्ष्मी येथे अधिकाऱ्यांसाठी जिमखाना उभारण्याचा प्रस्ताव स्थापत्य समितीमध्ये दफ्तरी दाखल करण्यात आला होता. हा प्रस्ताव सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे ‘री-ओपन’ करण्याची मागणी केली. या मागणीला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिल्यानंतर प्रस्ताव मंजूर करण्यात आला. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजप गटनेते मनोज कोटक, सपाचे रईस शेख यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे महापौरांचा नवीन बंगला शिवाजी पार्कवरच होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
>प्रतिष्ठा जपण्यासाठी जागेची निवड
मुंबईचे विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निवासाची व्यवस्था सध्या वीरमाता जीजाबाई भोसले उद्यानातील पालिकेच्या बंगल्यात करण्यात आली आहे. मात्र मुंबईचे महापौर हे प्रतिष्ठेचे पद असल्याने मध्यवर्ती ठिकाणीच त्यांचे निवासस्थान असावे, अशी मागणी होत होती. जिमखान्याच्या जागेची निवड करण्यात आली.