नव्या महापौरांचा निवास सध्या पार्कातच
By admin | Published: March 16, 2017 03:32 AM2017-03-16T03:32:21+5:302017-03-16T03:32:21+5:30
दादर शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आल्यामुळे नवनिर्वाचित महापौर जाणार कुठे, असा प्रश्न निर्माण झाला होता.
मुंबई : दादर शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आल्यामुळे नवनिर्वाचित महापौर जाणार कुठे, असा प्रश्न निर्माण झाला होता. महापौर निवासस्थान भायखळ्यातील राणीच्या बागेत हलवण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. मात्र संभाव्य महापौर निवासस्थानास शिवसेनेच्या तत्कालीन सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी विरोध दर्शवला. त्यामुळे नव्या महापौरांच्या निवासस्थानाबाबत निर्णय होईपर्यंत नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या दादर येथील प्रशस्त महापौर बंगल्यात काही काळ मुक्काम करता येणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर निवासस्थान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. महापौर निवासस्थानाची जागा स्मारकासाठी विश्वस्त मंडळाला देण्याचा ठरावही महापालिका सभागृहात मंजूर झाला आहे. महापौरांचे निवासस्थान हे भायखळा येथील राणीबागेतील अतिरिक्त आयुक्तांचा बंगला असलेल्या जागेत स्थलांतरित करण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे नव्या महापौरांचा मुक्काम हा राणीबागेतील बंगल्यात होणार असे चित्र होते. परंतु राणीबागेतील नियोजित बंगला हा महापौरांच्या प्रतिष्ठेला साजेसा नाही. असा आक्षेप शिवसेनेच्या शिलेदारांनी घेतला आहे. दोन महिन्यांत दादरचा महापौर निवास स्मारकासाठी देणे भाग आहे. त्यामुळे महापौरांसाठी नवे निवासस्थान शोधणे आवश्यक बनले आहे. महापौरांना भेटण्यासाठी शेकडो नागरिक निवासस्थानी येत असतात. तसेच अनेक सामाजिक उपक्रम व कार्यक्रमही महापौर बंगल्यात होतात. मात्र राणीची बाग हे शांतता क्षेत्रात गणले जात असल्याचा युक्तिवाद सध्या केला जात आहे.़ हा वाद मिटून नवीन महापौर निवासस्थान निश्चित होईपर्यंत महाडेश्वर हे शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानात राहणार आहेत. निवासस्थानाबाबत काय निश्चित झाले, हे आपणास ठाऊक नाही. दादर येथील बंगल्याची पाहणी करण्यास आपण जाणार आहोत. त्यानंतर तिथे स्थलांतरित होणार असल्याचे महाडेश्वर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)