गर्भाशय शल्यक्रियेचे नवे तंत्र महिलांसाठी वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 06:02 AM2018-04-15T06:02:31+5:302018-04-15T06:02:31+5:30
अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नामवंत स्त्रीरोग शल्यचिकित्सक डॉ. आरती चोलकेरी-सिंग यांनी भारताच्या अनेक राज्यांमधून आलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञांसाठी कार्यशाळा घेऊन त्यांना गर्भाशयावर शल्यक्रिया करण्याच्या ‘मेकॅनिकल हिस्टरोस्कोपिक टिश्यू रिसेक्शन’ या नव्या तंत्राचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले.
मुंबई : अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नामवंत स्त्रीरोग शल्यचिकित्सक डॉ. आरती चोलकेरी-सिंग यांनी भारताच्या अनेक राज्यांमधून आलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञांसाठी कार्यशाळा घेऊन त्यांना गर्भाशयावर शल्यक्रिया करण्याच्या ‘मेकॅनिकल हिस्टरोस्कोपिक टिश्यू रिसेक्शन’ या नव्या तंत्राचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. शुक्रवार व शनिवारी झालेल्या या कार्यशाळेत २१ राज्यांतील २१ डॉक्टरांनी सहभाग घेतला.
डॉ. चोलकेरी-सिंग या अमेरिकेत शिकागो येथील इलिनॉय विद्यापीठाच्या ‘अॅडव्हान्स्ड गायनॅकॉलॉजिकल सर्जरी इन्स्टिट्यूट’मध्ये शल्यक्रिया शिक्षण विभागाच्या प्रमुख आहेत. गेली अनेक वर्षे अमेरिकेत रुग्णाच्या शरिरावर कमीत कमी छेद देऊन गर्भाशयाच्या पोकळीतील विकारांसाठी दुर्बिणीतून शल्यक्रिया करण्याचे ‘हिस्टरोस्कॉपी’ हे तंत्र वापरले जात आहे. याच तंत्रामध्ये आणखी सुधारणा करून डॉ. चोलकेरी-सिंग यांच्या संस्थेने ‘मेकॅनिकल हिस्टरोस्कोपिक टिश्यू रिसेक्शन’ हा प्रगत शल्यविधी विकसित केला आहे. यात कमीत कमी ऊर्जेचा वापर होत असल्याने शल्यक्रियेत गर्भाशयाच्या पेशींना कमीत कमी इजा पोहोचते. परिणामी अशा शस्त्रक्रियेनंतर अनेक स्त्रियांना अतिरक्तस्राव, वंध्यत्व अथवा ओटीपोटातील वेदना यासारखे जे त्रास सोसावे लागतात ते बऱ्याच प्रमाणात कमी होतात. डॉ. चोलकेरी-सिंग म्हणाल्या की, हे तंत्र एवढे सुटसुटीत आहे की, यासाठी रुग्णाला इस्पितळाच्या शस्त्रक्रियागृहात न नेता डॉक्टर त्यांच्या कन्सल्टिंग रूममध्येही ही शल्यक्रिया करू शकतात.
हल्ली महिला कौटुंबिक आणि कार्यालयीन अशा जबाबदाºया बरोबरीने पार पाडत असल्याने मोठ्या शस्त्रक्रियांनंतर पूर्ण बºया होऊन पुन्हा कामाला लागण्यासाठी अनेक दिवस झोपून राहणे त्यांना परवडणारे नसते. अशा वेळी अशा कमीत कमी वेळात करता येणाºया आणि कमी त्रासाच्या शल्यक्रियेचे तंत्र हे एक वरदान ठरते.
प्रसार होईल, असा आशावाद
भारतात हे तंत्र नवे असले, तरी कार्यशाळेत आलेल्या डॉक्टरांनी ते शिकण्यात दाखवलेला उत्साह पाहता ते स्वत: त्याचा वापर करतील व तरबेज झाल्यावर इतरांना शिकवून आणखी प्रसार करतील, असा विश्वास डॉ. चोलकेरी-सिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.