मेट्रोचे नवे डबे बंगळुरूहून मुंबईत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 02:45 AM2019-09-04T02:45:52+5:302019-09-04T02:45:58+5:30
एमएमआरडीए मैदानात ठेवण्याची व्यवस्था : मेट्रो-२ आणि मेट्रो-७ साठी आवश्यक
मुंबई : मेट्रो-२ आणी मेट्रो-७ मार्गिकेसाठी आवश्यक असणारे मेट्रोचे डबे मुंबईत नुकतेच दाखल झाले आहेत. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी हे डबे बेंगळुरूवरून मुंबईमध्ये आणण्यात आले. हे डबे वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) येथील एमएमआरडीएच्या मैदानावर ठेवण्यात आले आहेत. यावेळी एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए.राजीव यावेळी उपस्थित होते.
दहिसर ते डी.एन.नगर या मेट्रो-२ अ आणि डी.एन.नगर ते मंडाले (मेट्रो-२ ब) आणि दहिसर (पूर्व) ते अंधेरी पूर्व या मेट्रो-७ मार्गिकांचे काम सध्या जलदगतीने सुरू आहे. मेट्रो-७ मार्गिकेचे आत्तापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याने मेट्रो गाड्यांच्या निर्मितीलाही सुरूवात करण्यात आली आहे. नव्या वर्षामध्ये मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार असल्याने हे डबे मुंबईमध्ये आणण्यात आले आहेत.
या डब्यांची नोव्हेंबर २०१८ मध्ये आॅर्डर देण्यात आली होती, सुमारे १८ महिन्यांनंतर सोमवारी बेंगळुरूतील बीईएमएल कंपनीतून हे डबे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. हे डबे बीकेसीमध्ये दाखल झाल्यावर एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी त्याची पूजा केली. यानंतर हे डबे एमएमआरडीएच्या मैदानावर ठेवण्यात आले होते. एमएमआरडीएने बीईएमएल या कंपनीसोबत नोव्हेंबर २०१८ मध्ये ३ हजार १५ कोटी रूपयांचा करार केला आहे. या कंत्राटाअंतर्गत १८ महिन्यांनंतर पहिला डबा मुंबईमध्ये दाखल झाला आहे. करारानुसार ६ डब्ब्यांच्या ६३ मेट्रो तयार करण्यात येणार असून पहिली मेट्रो जुलै २०२० मध्ये मुंबईमध्ये दाखल होईल. यासह मेट्रो मार्गांचे विस्तारिकरण लक्षात घेऊन आणखी २१ मेट्रो बनवण्याचे कंत्राटही कंपनीला देण्यात आले आहे.
मेट्रो मार्गिकांवर धावणाºया मेट्रोचे डबे हे हलके आणि उर्जा वाचवणारे असणार आहेत. ही मेट्रो पूर्णपणे स्वयंचलित असणार आहेत. यामध्ये ३३४ प्रवाशांची आसन व्यव्स्था असणार आहे. एकूण २ हजार ९२ प्रवासी एका मेट्रोमधून प्रवास करू शकणार आहेत. डब्यांमध्ये व्हिलचेअर्ससाठी जागा उपलब्ध असेल, तर डब्यांबाहेर सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून मेट्रो प्रवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव मेट्रो चालकासोबत प्रवासादरम्यात संवादही साधता येणार आहे. मेट्रो मार्गिकांवर स्क्रिन डोअर्सही बसवण्यात येणार आहेत.
विद्यानगरी मेट्रो स्थानकाचे पन्नास टक्के काम पूर्ण
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या कामाला आता वेग आला असून यासह या मेट्रो मार्गिकेतील मेट्रो स्थानकाच्या बांधकामालाही आता वेग आला आहे. या मार्गिकेवरील विद्यानगरी मेट्रो स्थानकाचे आत्तापर्यंत पन्नास टक्के काम पूर्ण झाले असून सहाव्या बेसस्लॅपचे काम पूर्ण झाले आहे. याचे एकूण क्षेत्रफळ ५७० चौरस मीटरचे असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) सांगण्यात आले.
मेट्रो-३ मार्गिकेमध्ये एकूण २७ स्थानके आहेत. एमएमआरसीकडून या मार्गिकेच्या भुयारीकरणाला आता वेग आला असून आत्तापर्यंत ६० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. भुयारीकरणासोबतच एमएमआरसीने मेट्रो स्थानकांच्या बांधकामावरही लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये विद्यानगरी, कफ परेड, सहार रोड स्थानक, एमआयडीसी स्थानक, सीएसटी स्थानक अशा विविध मेट्रो स्थानकांच्या कामाला गती आली असून आर्धापेक्षा जास्त काम पूर्ण झाले असल्याचे एमएमआरसीतर्फे सांगण्यात आले आहे.
मेट्रो- ३ मार्गिकेचे भुयारीकरण करण्यासाठी सध्या १७ टनेल बोरिंग मशिन कार्यरत आहेत. आत्तापर्यंत ३३ किमी मार्गिकेचे भुयारीकरण पूर्ण झाले असून यासाठी २३ हजार ३२९ रिंगचा वापर झाला असल्याचे एमएमआरसीकडून सांगण्यात आले आहे. आत्तापर्यंत एकूण ६० टक्के भुयारीकरण पूर्ण झाले असून डिसेंबर २०१९ रोजीपर्यंत ८० टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.